VIDEO : एका चुकीमुळे कलावंताच्या आयुष्यात झाला अंधार, २० वर्षांपासून लहानशा 'डार्करुमध्ये' जगतोय जीवन

artist face problems due to blindness in nagpur
artist face problems due to blindness in nagpur
Updated on

नागपूर : एक चूक झाली आणि एक कलावंत मागील २० वर्षांपासून आपल्या डोळ्यात अंधार घेऊन जगत आहे. जनजागृतीसाठी रस्त्यावर गर्जना करणाऱ्या कलावंताच्या भुकेचे संगीत आज कोणालाच ऐकू येत नाही. आता तो एकटाच घराच्या ८ बाय १० फुटांच्या डार्क रुममध्ये जगतोय. या विपन्नावस्थेत जगणाऱ्या या पात्राचे नाव आहे अनंता टेंभुर्णे. आज रंगभूमीदिनानिमित्त आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. 

सांस्कृतिक चळवळीतील हा कलावंत. लहानपणीच अभिनयाशी दोस्ती झाली. मात्र, मायग्रेनचा त्रास घेऊन जगत होता. कोणाला सांगितलं नाही, हीच एक छोटीशी चूक त्याला भोवली आणि २००३ मध्ये दृष्टी गेली. तेव्हापासून डोळ्यात काळाकुट्ट अंधार दाटला. उजेडापासून दुरावलेला अनंता २४ तास रात्र असल्याचा अनुभव घेतो. उत्तर नागपुरातील अंगुलीमाल नगरातील घरी अनंताची भेट घेतली. खाटेवर बसलेला अनंता. बाजूला टिनाची पेटी ठेवलेली. बेवारस जिंदगीची कथा उकलताना पेटीचं कुलूप उघडलं, तसां त्याच्या आयुष्याचा फ्लॅश बॅक पुढे आला. कलेने झपाटलेल्या कलावंताच्या आयुष्याची ही शोकांतिका आज बघवत नाही. त्याने चिमुकल्या वयात 'रक्त गळतयं...गळू दे...भीमा'साठी हे नाटक केलंय. मात्र, आज अनंतासारख्या चळवळीतील निखाऱ्याला समाजाने जपण्याची गरज आहे.

वयाच्या साठीजवळ पोहोचलेल्या अनंताने २० ते २२ वर्ष रंगमंचावर कधी पथनाट्य, महानाट्य, एकांकिकांपासून शासनाच्या गीत नाट्य विभागाच्या 'शतरुपा' नाटकांतून भूमिका केल्या. कमलाकर डहाट यांचे नरबळी, मसन्या ऊद, सुनील रामटेकेंचे मंडल, 'महासूर्य'पासून तर 'रक्त उसळतं माझं' स्वातंत्र्य हवे आम्हाला, जयभीम, उकिरडा, समरयात्रा, भोलाराम इंडियन, ४७ एके ४७, अशा ८० ते ८२ नाटकातून समाज जागवण्यासाठी 'जागल्या' भूमिका केली. झाडीपट्टी रंगभूमीही गाजवली. 

कलावंताची शोकांतिका - 
अनंताने कमलाकर डहाट, अमर रामटेके, प्रेम जीवने, कमल वागघरे, वि. रु. गोडबोले, सुनील रामटेके यांच्या नाटकात भूमिका केल्या. रंगमंच गाजवणाऱ्या अनंतावर दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर मदतीचे आश्वासन देणाऱ्यांनी कधीच या कलावंताकडे फिरकून पाहिले नाही. त्याच्यासोबतचे लेखक, दिग्दर्शक आज कोणी मुंबईत तर कोणी नागपुरात स्थिरावले आहेत. मात्र, अनंताच्या शोकांतिकेला सुखान्तांत बदल करण्यासाठी कोणीही मदतीचा हात पुढे करत नाही. 

टाळ्यांचा कडकडाट हृदयातील कप्प्यात -
डोक्यात नाटक असलेला अनंताला पत्नी लता सारखी म्हणायची , हे काय नाटक लावलं...लेकरं आहेत. त्यांच्याकडे जरा बघा, नाटकानं पोट भरतंय का? मात्र अनंता आजही म्हणतो...डोळ्यात नजर आली तर नाटकासाठी जिंदगी बहाल करीन. त्यांची पत्नी आता भांडी घासते, मातीगोट्याच्या कामाला जातात. मुली जवळ नाहीत. पथनाट्यात, महानाट्यात, एकांकिका आणि नाटकात रसिकांच्या टाळ्यांचा कडकडाट आजही हृदयातील कप्प्यात साठवून ठेवला असल्याचे अनंता सांगतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.