नवेगावबांध (जि. गोंदिया) : उमरी, सावरटोला परिसरात लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवार, २८ जुलै व सोमवार, २९ जुलै रोजी उमरी येथील दोन शाळकरी मुलींचा अपहरण करण्याचा प्रयत्न झाला.
सदर टोळीमध्ये आठ ते दहा व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी अल्पवयीन मुलींनी दिली. प्राप्त माहितीनुसार, रविवार, २८ जुलै रोजी सायंकाळी चारच्या सुमारास उमरी येथील इयत्ता सातवी वर्गात शिकत असलेली अल्पवयीन शाळकरी मुलगी बोरटोला येथील किराणा दुकानातून सामान घेऊन घरी जात होती.
तेव्हा उमरी गावाजवळच वळणावर मिनी मॅटेडोरमधून (टाटा एस) काही जण उतरले, त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावला होता. त्यांनी मुलीचा हात धरून तिला बळजबरीने मॅटेडोरमध्ये बसविण्याचा प्रयत्न केला.मात्र, मुलीने आरडाओरड केली. सुदैवाने एक दुचाकीस्वार बोरटोल्याकडून येत होता.
त्यांना हाक मारताच सदर व्यक्ती मॅटेडोरमध्ये बसून बाक्टीच्या दिशेने पळून गेले. सोमवार, २९ जुलै रोजी सकाळी पुन्हा उमरी ते बोरटोला मार्गावरील वळणावर एक चारचाकी नवेगावबांधच्या दिशेकडून आली.
सातव्या वर्गात शिकत असलेली एक अल्पवयीन शाळकरी मुलगी दुधाची कॅटली घेऊन दूधडेअरीवर दूध देऊन सकाळी ८.३० ते ९ च्या सुमारास घराकडे परत येत असताना याच वळणावर पांढऱ्या रंगाची चारचाकी थांबली. त्यातील काही व्यक्तींनी मुलीचा हात धरून तिला जबरदस्तीने गाडीमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला.
मात्र, मुलगी जोरात ओरडली. तिचे काका सावरटोलावरून तिच्या मागोमाग येत होते. तिचे वडील बाजूला शेतात होते. तिने आवाज दिला तेव्हा ती व्यक्ती गाडीत बसून बोरटोल्याच्या दिशेने पळून गेले. सदर चारचाकी बाक्टीच्या दिशेने गेल्याची माहिती आहे.
एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी व तिच्या मागे मिनी मॅटेडोर (टाटा एस) या दोन्ही गाड्या एका मागोमाग एक असतात, असे सांगण्यात येत आहे. परिसरात शाळकरी मुलांना टार्गेट करून मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.