दीड वर्षांपासून बंद असलेल्या वाळूघाटांचे लिलाव लवकरच, पर्यावरण समितीच्या ऑनलाइन सुनावणीत निर्णय

Auction of sand will be soon in yavatmal
Auction of sand will be soon in yavatmal
Updated on

यवतमाळ : वाळूघाटांच्या लिलावासंदर्भात पर्यावरण समितीने शुक्रवारी (ता.26) ऑनलाइन सुनावणी घेतली. त्यामुळे आता दीड वर्षांपासून रखडलेला जिल्ह्यातील वाळूघाटांच्या लिलावाचा प्रश्न मार्गी निघण्याची शक्‍यता आहे. यंदा जिल्ह्यातील 32 वाळूघाटांचा लिलाव करण्यात येणार असून, काही घाट शासकीय कामांसाठी राखीव ठेवले जाणार आहेत. 

गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यातील वाळूघाटांची लिलावप्रक्रिया रखडून पडली आहे. या वाळूघाटासंदर्भात न्यायालयात दाखल करण्यात आलेली प्रकरणे व इतर काही तांत्रिक अडचणींमुळे लिलावप्रक्रिया पार पडली नाही. ही लिलाव प्रक्रिया रखडून पडल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला. इतकेच नव्हे, तर या वाळूघाटांचा लिलाव न झाल्याने माफियांसाठी ही सुवर्णसंधी ठरली. वाळूमाफियांनी जिल्ह्यात असलेल्या सर्वच घाटांवरून दीड वर्षांच्या कालावधीत बेसुमार उपसा केला. त्यांच्याकडून करण्यात येत असलेली चोरी अजूनही सुरू आहे. त्यासंदर्भात महसूल व पोलिस प्रशासनाकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईवरून त्याला दुजोरा मिळतो. माफियांनी वाळूघाटांची चाळणी करून ठेवली आहे. त्यामुळे आता लिलाव झाले तरी त्यामध्ये उपलब्ध असलेला साठा हा अत्यल्प असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे या घाटाच्या लिलावातून हवा त्या प्रमाणात प्रशासनाला महसूल मिळण्याची शक्‍यता आता कमी आहे.

जिल्हा खनिकर्म विभागाने पर्यावरण समितीकडे पाठविण्यात आलेल्या घाटांच्या लिलावाच्या प्रस्तावासंदर्भात सुनावणी शुक्रवारी (ता.26) झाली. त्यावर समितीकडून अहवाल प्राप्त होताच जिल्ह्यातील घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू  होणार आहे. सर्वप्रक्रिया पूर्ण करून डिसेंबर महिन्यात वाळूघाटांचा लिलाव होण्याची शक्‍यता आहे. घाटांचा लिलाव झाल्यास त्याची मुदत 30 सप्टेंबर 2021पर्यंत असणार आहे. असे असले तरी 10 जून ते 30 सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत घाटांमधन वाळू उपसा करण्यावर बंदी राहणार आहे. यंदापासून या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

राखीव घाटांची संख्या वाढणार -
जिल्ह्यातील 32 घाटांचा लिलाव लवकरच होण्याची शक्‍यता आहे. त्यातील सात घाट आधीच शासकीय कामांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे 25 घाटांवरूनच जिल्ह्यात वाळूचा पुरवठा केला जातो. यंदा 25मधील काही घाट राखीव होण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात येत्या काही दिवसांत निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.