बाबू अच्छेलाल म्हणाले, गोसेखुर्दचे पाणी आले आणि परिसरातील शेती सुजलाम सुफलाम झाली. परंतु सावली तालुक्यातील शेतकऱ्यांचा घसा कोरडाच राहिला.
सावली (चंद्रपूर): एखाद्या प्रकल्पाचे रखडणे काय असते आणि त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांची कशी फरफट होते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सावली तालुका (Savali taluka). येथील शेतीला बारमाही सिंचन व्हावे, यासाठी ब्रिटिशांच्या काळात म्हणजेच १९०२-०३ च्या दरम्यान १८ लाख आठ हजार ४५६ रुपये खर्चून आसाेला मेंढा तलावाची (Mendha pond) निर्मिती करण्यात आली. तत्कालीन लोकसंख्या आणि उपलब्ध साधनसामग्रीत तयार झालेल्या या प्रकल्पाचे पाणी कालांतराने कमी पडू लागले. त्यामुळे सिंचनक्षेत्र वाढवून असोला मेंढा तलावात गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी आणण्याचा चांगला विचार तत्कालीन सत्ताधारी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि विरोधी पक्षात असलेले विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्या मनात आला. त्याला मूर्त रूपही देण्यात आले.
यावेळी बाबू अच्छेलाल म्हणाले, गोसेखुर्दचे पाणी आले आणि परिसरातील शेती सुजलाम सुफलाम झाली. परंतु सावली तालुक्यातील शेतकऱ्यांचा घसा कोरडाच राहिला. आसोला मेंढा प्रकल्पाचे पाणी त्यांच्या शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी थोड्या प्रयत्नांची गरज आहे. परंतु प्रकल्प कंत्राटदार, इंजिनिअर यांच्यासोबत सारेच ढेपाळल्याने प्रकल्पाचा अश्व अर्ध्यावर अडकला. सिंचनाअभावी शेतकऱ्यांसह साऱ्यांनाच अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंग्रजांना जे ११० वर्षांपूर्वी जमले ते स्थानिक राजकारण्यांना जमले नाही. प्रकल्पाला गती देऊन शेतीसाठी बारमाही सिंचन करण्यासोबतच प्रकल्प परिसरात पर्यटनाच्या दृष्टीने विकास केल्यास शेतकऱ्यांसह साऱ्यांचेच भले होईल.
मूलचा दौरा आटोपून सावली तालुक्याकडे निघालो. सावलीच्या बसथांब्यावर ‘सकाळ’चे सावली येथील तालुका बातमीदार सुधाकर दुधे यांनी रिसिव्ह केले. त्यांच्यासोबत कृषी अधिकारी उमेश शिंदे होते. सावली तालुक्यातील आसोला मेंढा तलावाच्या ठिकाणी पोहोचताच पाथरी येथील उपसरपंच प्रफुल्ल तुंमे यांनी ग्रामपंचायतीत चहा-नाश्त्याची सोय केली. यावेळी चर्चेदरम्यान त्यांनी रखडलेल्या आसोला मेंढा प्रकल्पाचा मुद्दा मांडला. सिंचन प्रकल्पाअभावी पाणी शेतीपर्यंत पोहोचत नसल्याचे त्यांनी सांगितले आणि याच व्हायब्रंट मुद्याच्या खोलात शिरण्यासाठी आम्ही निघालो. तलावाच्या पाळीलगत सात कोटी रुपये खर्चून असोला मेंढा मुख्य दरवाजाचे काम सुरू दिसले.
आसोला मेंढा तलावाचे पाणी सावली तालुक्यापुरते मर्यादित नाही. मूल, पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्याचे सिंचन याच प्रकल्पावरून होते. त्यामुळे पाणीपुरवठा कमी पडतो. गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत सावली तालुक्यातील आसोला मेंढा तलावात पाणी आणून, शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाकरिता आतापर्यंत १,७९६ कोटी रुपये मंजूर केले. मात्र, राजकीय फेरबदलामुळे गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत असोला मेंढा सिंचन प्रकल्पाचा प्रश्न ३३ वर्षांपासून अधांतरीच आहे.
चार महिने शेती, बाकी काळ पडीतच
ब्रिटिशकालीन आसोला मेंढा प्रकल्पाची निर्मिती झाली त्यावेळी प्रकल्पाची सिंचनक्षमता १० हजार हेक्टर होती. परंतु, सध्या प्रकल्पाची सिंचनक्षमता ५४ हजार ५८९ हेक्टरपर्यंत वाढविण्यात आली. तालुक्यातील १२ गावांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रस्तावित आहे. ज्या शेतात प्रकल्पाच्या पाण्याचा साठा होतो त्या भागातील शेतीला बुडित क्षेत्र घोषित करून नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला. परंतु दिरंगाईमुळे शेतकऱ्यांच्या समस्या अद्याप कायम आहेत. गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी या तलावात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या दृष्टीने गराडी नाल्याच्या सहाय्याने असोलामेंढा तलावात पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यावेळी भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम जलपूजन करून तलावात गोसेखुर्दचे पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन विरोधी पक्ष नेते व या क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनीही जलपूजनाचा कार्यक्रम घेऊन तलावात पाणी आणण्याची जबाबदारी स्वीकारली. परंतु आसोला मेंढा तलावातील पाणी सावली तालुक्याला मिळण्यास विलंबच होतो. याच प्रकल्पावर तालुक्यातील शेतकरी अवलंबून असल्याने केवळ चार महिनेच उत्पादन घेतले जाते.
पर्यटनस्थळाची घोषणा; परंतु कृती शून्य
सावली तालुक्यात पर्यटकांना राहण्यासाठी ब्रिटिशांच्या काळापासूनच तलावाच्या पाळीवर विश्रामगृहाची निर्मिती करण्यात आली. परंतु, सध्या विश्रामगृह पर्यटकांसाठी खुले नसल्याने पर्यटकांच्या राहण्याची अडचण होते. गोसेखुर्द जलपूजनाच्या वेळी भाजपचे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यटनस्थळ निर्मितीची घोषणा तीन ते चार वर्षांपूर्वी केली होती. तिजाेरीची चावी माझ्याच हातात आहे, वाटेल तेवढा निधी पर्यटन विकासाकरिता देऊ, अशी घोषणा केली. तर विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनीही मागे न राहता पर्यटन विकासासाठी १० कोटी रुपये खेचून आणून तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे पर्यटनस्थळ बनवू, अशी घोषणा केली होती. मात्र, दोन्ही लोकप्रतिनिधींच्या घोषणा हवेत विरल्या. या तलावाचा अद्याप कोणताही विकास झालेला नाही.
कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे कामे अर्धवट
सावली तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या कामाला काही ठिकाणी सुरुवात झाली. परंतु, कंत्राटदार व इंजिनिअर यांच्या हलगर्जीपणामुळे बऱ्याच ठिकाणी कामे अर्धवट आहेत. त्यामुळे सदर प्रकल्प पूर्ण होताना दिसत नाही. याकडे वरिष्ठ पदाधिकारी तसेच संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरून शेतकऱ्यांना लाभ होईल. असोला मेंढा पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येईल.
-सुनीता दिवाकर काचिनवार, सरपंच, ग्रामपंचायत कापसी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.