जन्मानंतर चार वर्षांतच क्रांतिकारकाला फाशी!

जन्मानंतर चार वर्षांतच क्रांतिकारकाला फाशी!
Updated on

नागपूर - आदिवासी जमातीतील क्रांतिकारक बाबूराव शेडमाके यांचा जन्म 1854 मध्ये झाला, त्यानंतर त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले आणि त्यांना 1858 मध्ये फाशी दिली, असा चुकीचा इतिहास आदिवासी विभागानेच छापल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे, शेडमाके केवळ चारच वर्षांचे आयुष्य जगल्याचा जावईशोध या विभागाने लावल्याने आदिवासी जमातीत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. हा चुकीचा इतिहास छापण्याचा आदिवासी विभागाने तब्बल तीन कोटी रुपये खर्च केल्याचेही समजते.

राज्य शासनाच्या आदिवासी विभागाने या वर्षी कॅलेंडर छापले. या कॅलेंडरमध्ये आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांच्या माहितीसोबतच आदिवासी जमातीतील इंग्रजांविरोधात लढणाऱ्या क्रांतिकारकांचा इतिहासही छापण्यात आला. क्रांतिकारकांचा इतिहास छापताना आदिवासी विभागाने कुठलाही अभ्यास केला नसल्याचे विदर्भातील क्रांतिकारक बाबूराव शेडमाके यांच्या चुकीच्या इतिहासावरून दिसून येत आहे. कॅलेंडरच्या ऑगस्ट महिन्याच्या पानावर शेडमाके यांचा इतिहास छापण्यात आला आहे. यात शेडमाके यांचा जन्म 1854 मध्ये झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांनी चंद्रपुरात 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धात 500 आदिवासी युवकांना एकत्र करून सेना उभारली. या माध्यमातून त्यांनी इंग्रजांना चांगलेच जेरीस आणले. एप्रिल 1858 मध्ये त्यांनी चिचगुडी येथील शिबिरावर हल्ला करून दोन इंग्रजांना ठार केले. चार महिन्यांनंतर इंग्रजांनी त्यांना सप्टेंबरमध्ये अटक करून चांदा मध्यवर्ती कारागृहात आणले. 21 ऑक्‍टोबर 1858 रोजी त्यांना फाशी देण्यात आली, असे आदिवासी विभागाने नमूद केले आहे. या इतिहासावर विश्‍वास ठेवल्यास बाबूराव शेडमाके केवळ चारच वर्षांचे आयुष्य जगल्याचे दिसून येते! विशेष म्हणजे हे सर्व कॅलेंडर आदिवासी विभागाने शाळा, महाविद्यालयांमध्येही पाठविले आहे. त्यातून विद्यार्थ्यांना चुकीच्या इतिहासाची माहिती दिली जात आहे. हा चुकीचा इतिहास छापण्याचा आदिवासी विभागाने तब्बल तीन कोटी रुपये खर्च केल्याचेही समजते. एवढी मोठी रक्कम खर्च करूनही चुकीचा इतिहास नागरिकांपर्यंत जात असल्याने अखिल भारतीय आदिवासी विकास युवा व विद्यार्थी परिषदेच्या नागपूर विभागाने संताप व्यक्त करीत चौकशीची मागणी केली आहे.

आदिवासी जमातीतील क्रांतिकारक बाबूराव शेडमाके यांचा जन्म 1833 मध्ये झाला. मात्र, आदिवासी विकास विभागाने कॅलेंडरमध्ये चुकीचे जन्मवर्ष छापले. याचा परिषद निषेध करीत असून, या विभागाने शुद्धिपत्रक काढून क्षमा मागावी. विशेष म्हणजे यावर तीन कोटी खर्च झाल्याचे समजते. यातही नक्कीच घोळ असून, नागपुरात एकही कॅलेंडर आदिवासी जमातीपर्यंत पोहोचले नाही. याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी अपर आदिवासी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
- दिनेश शेराम, अध्यक्ष, अ. भा. आदिवासी विकास युवा व विद्यार्थी परिषद, नागपूर विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.