गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील रावनवाडी टोली येथील टेंभली तलाव परिसरात शुक्रवार (ता. 26) हिवाळ्यात स्थलांतर करणारे दुर्मिळ असलेले दोन पट्टकादंब पक्षी मृतावस्थेत आढळून आले आहेत. आता हिवाळी स्थलांतराचा काळ संपला असतानाही हे पक्षी या परिसरात कसे आणि त्यांचा मृत्यू नक्की कशाने झाला, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
दरवर्षी हिवाळ्यात पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील युरोप, सायबेरीया आदी परिसरातून मोठ्या संख्येने पक्षी स्थलांतर करून भारतात येतात. तसेच काही पक्षी हिमालयातील लडाख, तिबेट आदी भागांतून येतात. यात पट्टकादंब हंसाचा समावेश असतो. याला इंग्रजीत बार हेडेड गूज म्हणतात. हा राखाडी रंगाचा, बदकाच्या जातीतला म्हणजे पायांना पडदे असलेला पक्षी आहे. 75 सेमी इतक्या मोठ्या आकारच्या या पक्ष्याची अर्धी मान राखाडी रंगाची असते. पण मानेच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे असतात. तर पांढऱ्या डोक्यावर दोन काळे पट्टे असतात. मानेवरचे हे काळे पट्टेच यांना ओळखण्याची खास खूण आहे.
ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच येणारे हे बार हेडेड गूज किंवा पट्टकादंब हंस मार्चपर्यंत देशातील अनेक भागांत मुक्काम करतात आणि लगेचच तिबेटच्या दिशेने उलट्या प्रवासाला लागतात. भारतात लडाख येथे एप्रिल, मेमध्ये घरटी बांधून पिल्लांना जन्म देतात. तिबेटमधून निघालेला हा पक्षी जास्तीत जास्त अंतर रात्रीच्या वेळी कापतो आणि भारतात येतो. येताना 29 हजार 500 फूट म्हणजे 9 हजार मीटर इतक्या उंचीवरून उडण्याची क्षमता ठेवतो. इतकेच नव्हे तर या प्रवासात कमी प्राणवायू असणारा भाग त्याला पार करावा लागतो. अशा अगणित अडथळ्यांची शर्यत पार करून आलेल्या या पट्टकादंब हंसाचा परतीचा प्रवास मार्चपर्यंतच आटोपतो. पण, मार्च संपत असताना हे पक्षी या परिसरात मृतावस्थेत आढळले.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळ गाठून पंचनामा करून पक्ष्यांच्या मृतदेहाची सरकारी पद्धतीने विल्हेवाट लावली. सध्या उन्हाळी धानपिकाची रोवणी सुरू असल्याने रासायनिक खते किंवा कीटकनाशकयुक्त पाणी पिल्याने अथवा पक्ष्यांची शिकार करणाऱ्यांनी ठेवलेले विषारी दाणे, धान्य खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जलाशये जपण्याची गरज
दरवर्षी हिवाळ्यात युरोप, सायबेरीया व इतर अनेक परदेशातील परिसरातील हजारो पक्षी स्थलांतर करून येतात. यातील बहुतांश पक्षी हे पाणपक्षी आहे. असे पक्षी पाणस्थळांजवळ राहतात. तिथेच खाद्य ग्रहण करतात. त्यामुळे या पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी जलाशये जपण्याची गरज आहे. अनेकजण पाणपक्ष्यांची शिकार करण्यासाठी धान्यात युरिया किंवा इतर रासायनिक विष मिसळून अशा ठिकाणी पसरून ठेवतात. कित्येकदा जाळे व फासे लावून शिकार करतात. त्यामुळे वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.