Bhandara Gang Rape : दोन रात्र वेदनेनं विव्हळत होती पीडिता; वाचा घटनाक्रम

दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखी ही घटना असल्याचं सांगितलं जात असून राजकीय वर्तुळातून यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
Bhandara Gang Rape Case
Bhandara Gang Rape CaseSakal Digital
Updated on

Bhandara Gang Rape News

भंडारा : भंडाऱ्यात एका ३५ वर्षीय महिलेवर झालेल्या अमानुष सामुहिक बलात्कार प्रकरणानं महाराष्ट्र हादरला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर देखल घेतली आहे. याप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, पीडित महिलेवर ज्याप्रकारे अमानुष अत्याचार झाला आहे, त्याचा घटनाक्रम ऐकून कोणीही संवेदनशील माणूस सुन्न होईल.

भंडाऱ्यात नेमके काय घडलं?

पतीसोबत विभक्त झालेली एक ३५ वर्षीय महिला गोंदियामध्ये आपल्या बहिणीकडं आली होती. या ठिकाणी बहिणीशी भांडण झाल्यानंतर ती ३० जुलै रोजी रात्री आपल्या आईच्या घरी जाण्यासाठी निघाली. दरम्यान, वाटेत तिला घरी सोडण्याच्या बहाण्यानं पहिल्या आरोपीनं आपल्या कारमध्ये बसवलं आणि गोंदियाच्या मुंडिपार जंगलात घेऊन गेला आणि तिथं तिच्यावर पाशवी अत्याचार केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या आरोपीनं ३१ जुलै रोजी पळसगाव जंगलात नेऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार केला आणि तिला तिथेच सोडून पळून गेला.

यानंतर पीडित महिला कशीबशी जंगलातून मार्ग काढत भंडाऱ्यातील कन्हाळमोह या गावात पोहोचली. याठिकाणी तिची भेट एका दुचाकी दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीबरोबर झाली. या व्यक्तीनंही तिला घरी सोडण्याच्या बहाण्यानं दिशाभूल करत १ ऑगस्ट रोजी आपल्या मित्रासह या पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर कहर म्हणजे या दोघांनी पीडित महिलेला कन्हाळमोह गावातील पुलाजवळ विवस्त्र अवस्थेत सोडत निघून गेले. जखमी आणि विव्हळत असलेल्या अवस्थेत नागरिकांनी तिला पाहिल्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली त्यानंतर तिला नागपूरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या ठिकाणी सध्या पीडितेवर उपचार सुरु आहेत. (Crime News)

किती लोकांना अटक?

पीडितेच्या जबाबानुसार तिच्यावर चार जणांनी बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. पण घटनाक्रमानुसार प्रथमदर्शनी तीन आरोपींचा समावेश असल्याचं दिसतंय. दरम्यान, यामधील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार आहे. अटक झालेल्या आरोपींना ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस या आरोपींना घटनास्थळी नेऊन तपास करत आहेत. अमित सारवे आणि मोहम्मद अन्सारी असं या दोन अटक आरोपींची नावं आहेत. हे प्रकरण भंडारा पोलिसांकडून गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पीडितेला शुद्धीवर येण्यास ४ ते ५ दिवस लागणार

भंडारा येथील या अमानुष सामुहिक बलात्कार प्रकरणातील महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. रक्तस्त्राव थांबत नसल्यानं तिच्यावर कोलोस्टॉमी शस्त्रक्रिया केली. ही घटना निर्भया प्रकरणासारखी भयानक असल्याचं सांगितलं जात आहे. आवश्यक नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. सध्या ती मोठ्या मानसिक धक्क्यात असून तिला पूर्ण शुद्धीवर येण्यास चार ते पाच दिवस लागण्याची शक्यता तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून व्यक्त केली आहे.

एसआयटीमार्फत चौकशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

या अमानुष प्रकाराची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतली असून याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे या एसआयटीमध्ये महिला आयपीएस अधिकाऱ्याचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर पोलीस महासंचालकांशी देखील मुख्यमंत्र्यांनी बातचीत केली असून पीडित महिलेला कोणत्या प्रकारची मदत कमी पडू देऊ नका असे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्राकडं लक्ष नाही - अजित पवार (Ajit Pawar)

हे जे काही घडतंय ते माणुसकीला काळीमा फासणार आहे. कोणत्याच राज्यकर्त्यांच्या काळात हे घडता कामा नये. प्रशासनाचा दरारा, पोलिसांचा दबदबा असला पाहिजे. प्रशासनावरही मंत्रिमंडळाची जी पकड असायला हवी ती सध्या नसल्यामुळं अशा प्रकारच्या गोष्टींना महाराष्ट्राला सामोरं जावं लागत आहे. यामुळं महाराष्ट्रातील कोवळ्या मुलींना आपले प्राण गमवावे लागत आहेत. याचसाठी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली का? याचं उत्तर महाराष्ट्राला मिळायला पाहिजे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली पीडितेची भेट (Chitra Wagh)

भंडारा जिल्ह्यातील या सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेची भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भेट घेतली. तसेच नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांकडून याप्रकरणाची माहिती घेतली. सध्या ही पीडित महिला बोलण्याच्या स्थितीत नाही, तिला व्यवस्थित होण्यासाठी स्टेटमेंट देण्यासाठी चार पाच दिवसांचा वेळ देणं गरजेचं आहे. पण डॉक्टरांना दिलेल्या माहितीत तीनं तीन नव्हे तर चार आरोपी होते असा जबाब दिला आहे. त्यामुळं चौथा आरोपी कोण हे ती जेव्हा पूर्ण शुद्धीत येईल तेव्हाच कळू शकेल.

नीलम गोऱ्हेंनी मुख्यमंत्र्यांना दिले कारवाईचे निर्देश (Neelam Gorhe)

मला खेद वाटतो की मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं विविध भागात भेटी दिल्या पण या घटनेची त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळं याप्रकरणी वेगळी टिका-टिपण्णी करण्यापेक्षा मी महाराष्ट्र विधानपरिषदेची उपसभापती या नात्यानं मी त्यांना निर्देश देते की त्यांनी याची दखल घ्यावी आणि अशा घटनांसंदर्भात आधीच्या सरकारनं जो शक्ती कायदा आणला त्यानुसार कारवाई करण्याची पोलिसांनी आठवण करुन द्यावी. बाकीच्या गोष्टींमधून वेळ काढत मुख्यंमत्र्यांनी या कायद्याला गती द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.