भंडारा : ट्रेसिंग, टेस्ट व ट्रिटमेंट या त्रिसूत्री सोबतच योग्य नियोजन व सामूहिक प्रयत्नामुळे भंडारा जिल्हा कोरोनामुक्त (bhandara corona free) झाला असून उपचाराखाली असलेल्या एकमेव रुग्णाला शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. १५ महिन्यानंतर जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात रुग्ण नसले तरी, सर्वांनी अधिक काळजी घेऊन कोरोनाचा संसर्ग होणार नाही यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. तसेच भंडारा कोरोनामुक्त होणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे.
देशात व राज्यात मार्च २०२० च्या दरम्यान कोरोनाने प्रवेश केला. सर्वत्र लॉकडाउन आणि प्रदेश व जिल्ह्यांच्या सीमा सील करूनही सर्वच जिल्ह्यांत कोरोनाने थैमान घातले होते. भंडारा जिल्ह्यात पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० रोजी गराडा (बु.) येथे आढळून आला. त्यानंतर रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी असला तरी, संसर्ग कमी होत नव्हता. जिल्ह्यात कोरोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद १२ जुलै २०२० ला झाली. नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता. मात्र, अचानक दुसरी लाट आल्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. दुसऱ्या लाटेचा प्रभाव जून महिन्याच्या मध्यापर्यंत कायम होता.
जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने यादरम्यान योग्य नियोजन करत दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यात यश मिळवले. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, त्यांची तपासणी-चाचणी व त्यावर वेळेत उपचार या सूत्राचा अवलंब करण्यात आला. त्याचाच परिणाम म्हणून रुग्णसंख्या आटोक्यात आली. शुक्रवारी शेवटचा रुग्ण बरा होऊन घरी गेला आणि जिल्हा कोरोनामुक्त झाला. या दीड वर्षाच्या काळात जिल्ह्यात कोरोनामुळे ११३३ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला.
५७८ व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली नाही. आतापर्यंत चार लाख ३९ हजार ८३२ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ५९ हजार ८०९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. ५८ हजार ६७६ व्यक्ती कोरोनावर मात करून आजारातून बऱ्या झाल्या. जिल्ह्यात आता एकही कोरोना रुग्ण शिल्लक नाही. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर ०१.८९ टक्के एवढा आहे.
दुसऱ्या लाटेचा फटका -
मार्च २०२० मध्ये सुरू झालेल्या कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराच्या पहिल्या लाटेवर भंडारा जिल्ह्याने यशस्वीपणे नियंत्रण मिळवले होते. मार्च २०२१ च्या शेवटी शेवटी आलेल्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. रुग्ण वाढीचा वेग १८ एप्रिल २०२१ पर्यंत कायम होता. १२ एप्रिलला सर्वाधिक एक हजार ५९६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तसेच एक मार्च ला एकाच दिवशी सर्वाधिक ३५ मृत्यूची नोंद जिल्ह्यात झाली. त्यानंतर केलेल्या ‘ब्रेक द चैन’ व विविध उपाययोजनांमुळे रुग्ण संख्या कमी कमी होत गेली. २२ एप्रिलला सर्वाधिक एक हजार ५६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यानंतर आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचीच संख्या अधिक राहिली आहे.
आकड्यांत असे झाले चढ-उतार
१५ फेब्रुवारी २०२१ ला क्रियाशील रुग्ण ९७ होते. हा आकडा १८ एप्रिलला १२ हजार ८४७ वर पोहचला होता. १९ एप्रिलला रुग्ण बरे होण्याचा दर ६२.५८ टक्के होता. आता तो ९८.११ टक्क्यांवर गेला आहे. १२ एप्रिलला पॉझिटिव्ही दर ५५.७३ टक्के होता, तो आता शून्य टक्क्यांवर आला आहे. आठ एप्रिलपर्यंत एकेरी आकड्यात असलेली मृत्यू संख्या नऊ एप्रिलपासून १२ मेपर्यंत दोन अंकी संख्येत होती. आत ती पुन्हा शुन्यावर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.