चंद्रपूर : महानगरपालिकेने शहरातील शंकुतला लॉन येथे सातशे खाटांच्या खासगी जम्बो कोविड सेंटरला परवानगी दिली आहे. या कोविड सेंटरवरून सध्या जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. त्यानंतर मनपातील सत्ताधाऱ्यांनीही प्रशासकीय बाब आहे, त्यात भाजपचा काही संबंध नाही, असे सांगून हात झटकले. दुसरीकडे खनिज विकास निधीतून कोविड रुग्णांच्या नि:शुल्क उपचारासाठी एक हजार खाटांचे जंम्बो हॉस्पिटल उभारावे, यासाठी शनिवारी (ता. २६) भाजपने आंदोलन केले.
नागपुरातील गंगा-काशी इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपनीने येथे खासगी जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी मिळविली. यात चंद्रपूर आणि नागपुरातील काही व्यावसायिकांची गुंतवणूक आहे. याला मनपातील एक अधिकारी आणि जिल्ह्यातील एका कॉंग्रेस नेत्याचे पाठबळ असल्याची चर्चा आहे. या कोविड सेंटरचे कामही अंतिम टप्प्यात आले.
एकीकडे शासकीय यंत्रणा लकवाग्रस्त करायच्या आणि खासगीसाठी पायघड्या घालायच्या, या दुटप्पी धोरणावरून अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला लक्ष केले. मनपात भाजपची सत्ता आहे. याच मनपाकडून या सेंटरला परवानगी मिळाली. यात शासकीय दरानुसार उपचार केला जाईल. मात्र, सध्या शहरातील खासगी रुग्णालयातील कोविड सेंटरकडून रुग्णांची होणारी लूट बघता यातही वेगळी स्थिती राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खासगी सोबतच शासकीय कोविड हॉस्पिटल उभे करावे, अशी मागणी राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून उमटत आहे. यापार्श्वभूमीवर अंगावर उडलेले शिंतोडे दूर करण्यासाठी भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि जिल्हा प्रशासनातर्फे केवळ घोषणा करण्यात येत आहे. प्रत्यक्षात घोषणांची अंमलजबावणी होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक यात भरडले जात आहे. तीन दिवसांआधी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून भाजपच्या शिष्टमंडळाने चंद्रपुरात खनिज विकास निधीतून कोविड रुग्णालयाच्या नि:शुल्क उपचारासाठी एक हजार खाटांचे जम्बो हॉस्पिटल उभारण्याची मागणी केली होती. त्यासाठी ४८ तासांचा अल्टीमेटम् दिला होता. त्याअनुषंगाने आजचे आंदोलन भाजपने केले. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी दिला. या आंदोलनात भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, भाजप नेते राजेंद्र गांधी, भाजयुमो महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, राजेंद्र अडपेवार, प्रकाश धारणे, प्रशांत विघ्नेश्वर यांची उपस्थिती होती.
भाजपचे शहराध्यक्ष मंगेश गुलवाडे यांच्याही शंभर खाटांच्या खासगी कोविड सेंटरला परवानगी मिळाली आहे. या आंदोलनात डॉ. गुलवाडे यांची उपस्थिती होती. खासगी आणि शासकीय हा मुद्दा आता नाही. लोकांना बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध झाले पाहिजे. लोक आयुष्यभर पैसा कमवितात. तो पैसा अशा संकटाच्या काळात उपयोगात आला तर नुकसान काय? असा सवाल गुलवाडे यांनी केला. सोबतच संपूर्ण रुग्ण शासकीय रुग्णालयातच जाणे आणि गर्दी करणे योग्य नाही, असा सल्लाही त्यांनी दिला. एकीकडे शासकीय कोविड केअर सेंटरसाठी आंदोलन करायचे आणि दुसरीकडे खासगीचे समर्थन, अशी दुटप्पी भूमिका यानिमित्ताने डॉ. गुलवाडे यांची समोर आली.
खासगी जम्बो कोविड सेंटरला मनपाने तत्त्व: मान्यता दिली. यापार्श्वभूमीवर खासदार बाळू धानोरकर यांनी आपली भूमिका आज जाहीर केली. खासगी जम्बो कोविड सेंटरला आपला विरोध नाही. मात्र, येथे शासनाने ठरवून दिलेले दरच घेतले पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. सध्या रुग्णालयातील संलग्नित कोविड सेंटरमध्ये आयसोलेशनचे चार हजार पाचशे, ऑक्सिजन बेडचे सात हजार पाचशे आणि आयसीयू व्हेंटिलेशनसाठी नऊ हजार रुपये रोज आकारले जात आहे. नव्या प्रस्तावित खासगी जम्बो कोविड सेंटरमध्ये हेच दर आकारणे अपेक्षित आहे. खासगी कोविड सेंटरच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कमिटी स्थापन करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांना देण्यात आल्या आहे, असे खासदारांनी सांगितले.
यापूर्वी खासगी कोविड सेंटरवरून खासदारांनी प्रशासनावर ताशेरे ओढले होते. प्रशासन अपयश लपविण्यासाठी खासगीला मान्यता देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र आता खासदारांनीच याचे स्वागत केले. आणखी दहा खासगी कोविड केअर सेंटर झाले तरी चालले मात्र रुग्णांना बेड उपलब्ध झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
घोषणांची अंमलबजावणी होत नाही
स्वातंत्र्यदिनी पालकमत्र्यांनी चारशे बेडच्या कोविड रुग्णालयाची घोषणा केली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती नाही. घोषणांची अंमलबजावणी होत नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे.
देवराव भोंगळे
जिल्हाध्यक्ष, भाजप.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.