नागपूर : हातात मोबाईल घेतला की व्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग, गुड नाइटसारख्या असंख्य अनुपयोगी मेसेजमुळे वैताग येतो. नको तो ग्रुप, नको ती वायफळ चर्चा असे वाटते. मात्र, अशाच एक ग्रुपवर (समूह) दररोज एका नवीन विषयावर चर्चा सुरू आली. हा उपक्रम एवढ्यावरच न थांबता शिक्षण या विषयावर काही औपचारिक तर काही अनौपचारिक झालेल्या चर्चेचे संकलन पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे या समूहावर झालेली चर्चा प्रशासनाच्या कानावर पडल्यामुळे काही प्रश्न मार्गीही लागले आहेत.
"व्हॉट्सऍप चर्चा शिक्षण विकासाच्या' या अनोख्या पुस्तकाविषयी माहिती देताना समूहाचे प्रशासक डॉ. वसंत काळपांडे म्हणाले, की दोन वर्षांपूर्वी हा ग्रुप तयार झाला. आपल्या मतांची, नवीन कल्पनांची दखल घेतली जात आहे, त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे, ही जाणीव सदस्यांना सुखावणारी होती. विशेष म्हणजे कोणत्याही विषयाबाबत नाण्याच्या दोन्ही बाजू तपासून त्यावर मत प्रदर्शित केले जाते. समूहात अनेकजण उच्चपदस्थ अधिकारी असल्यामुळे त्यांना तळागाळात काय चाललयं, एखाद्या निर्णयावर काय प्रतिक्रिया उमटत आहेत हे लक्षात आले.
प्रेरणा
महत्त्वाच्या विषयांबद्दल चर्चा तर झाली. पुढे काय? असा विचार केल्यानंतर काही जणांनी सुचविले की या चर्चांवर आधारित एक पुस्तक काढले पाहिजे. डॉ. काळपांडे, बसंती रॉय, डॉ. माधव सूर्यवंशी यांनी त्यास सहमती दर्शवली. समूहातील काही युवकांना हाताशी घेऊन व्हॉट्सऍपवरील चर्चेवर आधारित पहिल्या संकलित पुस्तकाची निर्मिती झाली. एकूण झालेल्या चर्चा जर पुस्तकात समाविष्ट केल्या असत्या तर त्यासाठी हजारावर पाने लागली असती. त्यामुळे त्यातून ठराविक, मोजक्या चर्चा या पुस्तकात घेण्यात आल्या आहेत.
परिणाम
काही चांगल्या कल्पना, नवीन बाबी समजून घेता आल्या. लहान किंवा दूरस्थ भागातील शिक्षक, जाणकार जोडले गेले. विशेष म्हणजे अनेक शासकीय निर्णय, धोरणांचा फेरविचार करण्यात आला, हे या उपक्रमाचे सर्वांत मोठे यश असल्याचे समूह प्रशासक, चालकांचे म्हणणे आहे.
विषय
शिक्षण, शाळा, शिक्षक आणि शासकीय शैक्षणिक धोरण या अनुषंगाने शुद्धलेखन, डिजिटल शाळा, शिक्षक, विद्यार्थी, दहावी-बारावी निकाल, सेल्फी निर्णय, शासन धोरण इत्यादी विषयांवर सांगोपांग चर्चा.
सकारात्मक दृष्टिकोन, साधकबाधक चर्चा निरोगी विचारसरणी दर्शविते. अनौपचारिक चर्चेसाठी तयार करण्यात आलेल्या या समूहात वाढदिवस, भाषणबाजी, पक्षीय राजकारण आदी बाबींना मज्जाव आहे. सदस्यांनी आपली मते, तपशील व विषयाशी निगडित योग्य संदर्भ देत हिरिरीने भाग घेतला.
- डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व समूह संचालक
नवीन करण्याची ऊर्मी
आधी मुंबई आणि पुण्यापुरता असलेला हा समूह हळूहळू विस्तारला. आता या समूहाचे चार भाग करण्यात आले असून एक हजाराच्या वर सदस्य आहेत. विशेष म्हणजे कोणतीही ओळख नसताना राज्याच्या एका कोपऱ्यातील व्यक्ती दुसऱ्या कोपऱ्यातील व्यक्तीशी मनमोकळा संवाद साधतो. काही अडचण असेल किंवा अधिक काही सुचवायचे असेल तर तर ते आपसात एकदुसऱ्याशी मोबाईलवर बोलतात. यातून नवीन काही करण्याची ऊर्मी जागृत होते, असे माजी सचिव मुंबई विभागीय शिक्षण मंडळ व समुहाच्या प्रशासक बसंती रॉय यांनी सांगितले.
समूहाची वैशिष्ट्ये
-मतभेद असले तरी वितंडवाद नाही
-वेगळा विचार करणाऱ्यांचा आदर
-कळकळ, प्रगल्भता यामुळे चर्चा दर्जेदार
-सकारात्मक, नकारात्मक पैलूंवर सारखाच भर
-नवनीवन प्रयोग करणाऱ्यांचे कौतुक |
|