बोरवेलच्या खटखटीने किटलेत कान! तरी सुटला नाही पाणीप्रश्न

बोरवेलच्या खटखटीने किटलेत कान! तरी सुटला नाही पाणीप्रश्न
Updated on

धानोरा (जि. गडचिरोली) : अन्न, वस्र, निवाऱ्यासोबतच पाणी नागरिकांची मूलभूत गरज आहे. म्हणूनच पाण्याला जीवन म्हटले जाते. परंतु, बऱ्याच ठिकाणी आजही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना दररोज पायपीट करावी लागते. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात ही समस्या प्रकर्षाने जाणवते. म्हणायला २०१५ साली धानोरा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर झाले. परंतु, सुविधांच्या नावाने आजही बोंबाबोंब आहे. एकीकडे बऱ्याच ग्रामीण भागात नळ योजनेचे जाळे विणले गेले. या माध्यमातून स्थानिकांना दररोज पाणीपुरवठा होतो. परंतु, धानोरावासी या बाबतीत कमनशीबी ठरले.(Borewell-Water-question-Dhanora-taluka-Gadchiroli-District-Lack-of-facilities-nad86)

नगरपंचायत झाल्याने नागरिकांवर कराचा भार तर वाढला; परंतु सुविधा मिळाल्या नाहीत. त्यांचा दिवस उजाडतो तो डोक्यावर हंडे घेऊन आणि मावळतोही तसाच. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत बोरवेलची खट खट सुरू असल्याने या आवाजामुळे आमचे कान किटलेत. आम्हाला इतर कोणत्या सुविधा नको, फक्त पिण्यासाठी शुद्ध पाणी द्या बस्स, अशी एकच मागणी येथील नागरिक अनेक वर्षांपासून करीत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे जातीने लक्ष देऊन नागरिकांची या समस्येतून मुक्तता करावी, एवढीच अपेक्षा.

बाहेरगावाहून कुणीतरी आल्याचे बघून स्थानिकांनी आम्हाला गराडाच घातला. २३ ते २५ वर्षांपासून आम्ही येथे वास्तव्यास आहोत. वर्षाकाठी घराचा करही भरतो. तरीही घरोघरी पाण्याचे नळ मिळालेले नाहीत. पाण्यासाठी बारमाही भटकंती करावी लागते; परंतु आता या भटकंतीचा कंटाळा आला, अशी कैफियत महिलांनी मांडली. गावात नळ पाणीपुरवठ्याची कुठलीच योजना नसल्याने कुणी डोक्यावर गुंड तर कुणी खांद्यावर कावडीने पाणी नेताना दिसले.

उन्हाळ्याच्या दिवसांत विहिरी कोरड्याठण्ण

तुमच्या वॉर्डात नळयोजना नाही का, असे विचारताच उन्हाळ्यात विहिरींना सुद्धा पाणी राहात नाही. आमच्या वॉर्डात नळ नाही. आम्ही नवीन वस्तीत पलाटावर राहतो. पलाटावर पाण्याची मोठीच बोंब आहे. २०१५ मध्ये धानोरा नगरपंचायत झाली. पाच वर्षे लोटूनही नळयोजना आली नाही. निवडणुकीत उभे राहताना वॉर्डातील पाणी समस्या सोडवू, अशी मोठमोठी आश्वासने लोकप्रतिनिधींकडून दिली जातात. परंतु सत्ता येताच त्यांना आश्वासनाचा विसर पडतो. पाच वर्षे उलटून गेले, नळयोजना काही आली नाही, सौरऊर्जेवर चालणारे नळ लावतो म्हणाले, परंतु तेही आश्वासन हवेत विरल्याचे येथील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. प्रभाग क्रमांक १० मध्ये फेरफटका मारताना सार्वजनिक विहिरीसाठी स्वतःची जागा दिली; पण उन्हाळ्यात विहीर कोरडीठण्ण पडते. नगरपंचायतीकडून टॅंकरने दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो, असे स्थानिकांनी सांगितले.

‘दोन वर्षांपूर्वी आले होते अधिकारी’

इतक्यात दोन महिला आल्या त्यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी नगरपंचायतीचे लोक आले होते. त्यांनी तपासासाठी पाणी नेले. विहिरीवर सूर्यप्लेट लावतो, असे त्यांनी सांगितले; परंतु त्याचे पुढे काहीच झाले नाही. शेतातून थकून आल्यावर विहिरीचे पाणी काढावे लागते. नळ असते तर ही वेळ आली नसती, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

नऊ कोटी रुपयांची नळयोजना मंजूर झाली. परंतु वराती डोह कठाणी नदीला लागून असलेल्या जमिनीचे अद्याप हस्तांतरण झालेले नाही. वराती डोहालगत प्रभू आदे यांची जमीन आहे. ती जमीन देण्यास ते तयार असल्याचे समजले. त्यांची भेट घेतली असता त्यांनी जमीन देण्यास होकार दर्शविला. नगरसेविकेने आपल्या घराजवळची जागा सार्वजनिक विहिरीसाठी उपलब्ध करून दिली. विहीरही खणली, परंतु उन्हाळ्यात या विहिरीला पाणीच राहात नाही. आम्हीसुद्धा टँकरनेच पाणी घेतो. पाणीप्रश्न सुटलाच पाहिजे.
- रंजना सोनुले, नगरसेविका, प्रभाग ११
विद्यानगर वॉर्ड क्रमांक एकमध्ये एकच सार्वजनिक विहीर आहे. आगामी काही दिवसांत या विहिरीवर सौरऊर्जेवर चालणारी प्लेट लावण्यात येईल. तसेच विहिरीचे सुशोभीकरण करून त्यास गट्टू लावण्यात येईल. याशिवाय लेडीज होस्टेलजवळ विद्यानगरसाठी पाण्याची टाकी होणार आहे. पाणी आरक्षणाची मंजुरी मिळाली. याचा फायदा संपूर्ण विद्यानगराला होणार आहे. पंचवीस वर्षांपासून जातीने लक्ष देणारे नव्हते; परंतु आता तशी वेळ येणार नाही.
- सुभाष धाईत, नगरसेवक वॉर्ड १

(Borewell-Water-question-Dhanora-taluka-Gadchiroli-District-Lack-of-facilities-nad86)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.