Video : अमरावतीतील तीन मजली व्यापारसंकुल कोसळले! आणि...

sankul.
sankul.
Updated on

अमरावती : पावसाळा आला की जुन्या इमारतींचा धोका अधिकच वाढतो. प्रत्येकच शहरात अशा इमारती असतात आणि त्यांना अनेकवार सूचना देऊनही त्या रिकाम्या केल्या जात नाहीत. अमरावती शहरही याला अपवाद नाही.

बुधवारपासून (ता.15) सुरू असलेल्या रिपरिप पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. अशातच मध्यरात्री दोनच्या सुमारास जयस्तंभ चौक परिसरातील तीन मजली महात्मा गांधी व्यापारसंकुलातील दुकाने कोसळली. इमारतीच्या ढिगा-याखाली दबलेल्या दोन चौकीदारांची महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका करून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सुदैवाने जीवितहानी टळली.

गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाने संततधार धरली आहे. पावसामुळे सुमारे सत्तर वर्षे जुन्या महात्मा गांधी व्यापारसंकुलातील दुकानांच्या भिंतीत पाणी मुरले. मध्यरात्री दोनच्या सुमारास पंधरा दुकाने कोसळली. रात्री ड्यूटीवर तैनात दोन चौकीदार कोसळलेल्या इमारतीच्या मलब्याखाली दबले. अग्निशमन दलास एका व्यक्तीने इमारत कोसळल्याची सूचना दिली. त्यानंतर पथकाने तातडीने धाव घेत मलब्याखाली दबलेल्या दोघांची सुटका केली. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

महापालिकेने ही इमारत शिकस्त घोषित केली असून गेल्या तीन वर्षांपासून ती पाडून टाकण्यासाठी सातत्याने नोटीस बजावली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचाच परिपाक ही इमारत कोसळण्यात झाला. सुदैवाने जीवितहानी टळली. पावसाचे पाणी मुरल्याने या इमारतीमधील एक दुकान आधी कोसळले, त्यानंतर इतर दुकानांच्या भिंतीत पाणी मुरत जाऊन एका पाठोपाठ एक, अशी पंधरा दुकाने कोसळत गेली.



अग्निशमन दलाचे फायरमन उताणे, भगत राठोड, तायडे, गौरव दंदे, गोविद घुले, मोहन वानखडे, मकवाने व वाहन चालक नितीन इंगोले, नीलेश आजने, राजू शेंडे, संजय चौहान, शोएब खान व आपत्कालीन कर्मचारी विपुल, कुरील शेख तौसिफ, शुभम सोनटक्के व उपक्रेंद्र प्रमुख सय्यद अन्वर यांनी ही कामगिरी पार पाडली. घटनास्थळास सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण, अतिक्रमण दलाचे गणेश कुत्तरमारे यांनी भेट देत पाहणी केली.

चौकीदारांना काढण्यास लागले अडीच तास
रात्री पावसातच अग्निशमन दलाच्या पथकाने बचावकार्यास सुरुवात केली. मलब्याखाली दबलेल्या चौकीदारांना बाहेर काढण्यास प्राधान्य देत त्यांनी महत्प्रयासाने त्यांना बाहेर काढले. आवाज देत त्यांनी ते नेमके कुठे दबले आहेत याचा अंदाज घेतला. पहिल्या चौकीदारास काढण्यास वीस मिनिटे लागली, तर दुस-याला काढण्यासाठी मात्र तब्बल दोन तास झुंजावे लागले.  

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.