यंदा धानाचे उत्पन्न कमी होऊनही खरेदी मात्र विक्रमी; व्यापारी झाले मालामाल; शेतकरी मात्र अजूनही चिंतेत   

rice crop market
rice crop market
Updated on

वैरागड (जि. गडचिरोली) : ऐन धान कापणीच्या वेळी तुडतुडा रोगाने हल्ला केल्याने धानाचे उत्पन्न अर्ध्यापेक्षा कमी झाले. असतानाही धानखरेदीचा आकडा नवनवे विक्रम रचत आहे. त्यामुळे छत्तीसगड राज्यातून धान्याची आयात करून व शेतकऱ्यांना थोडेबहुत पैसे देऊन त्यांच्या सातबारावर धान विकून व्यापारी मालामाल होत असल्याची ओरड स्थानिक शेतकरी व नागरिक करत आहेत. केंद्रावर शेतकऱ्याचे धान खरेदी करीत नसल्याने बॅंकांकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेत शेतकरी आहे.

दरवर्षी शेतकरी सहकारी सोसायटी व सरकारी बॅंकांकडून पीककर्ज घेऊन आपली शेती करत असतो. सरकारी धान खरेदी केंद्रावर धान विकून मार्चमध्ये शेतकरी कर्ज फेडतात. परंतु मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी खर्च जास्त करूनही धानाचे उत्पन्न अर्ध्यापेक्षा कमी झाले अनेक शेतकऱ्यांना खायचे वांधे झाले आहेत. मागच्या वर्षीपासून वैरागड येथे आधारभूत धान खरेदी केंद्राद्वारे धान खरेदी सुरू करण्यात आली. 

अनेक शेतकरी व धान्य व्यापारी धान खरेदी केंद्रावर धान नेऊन ठेवल्याने धानखरेदी करण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे यावर्षी टोकन पद्धत वापरून अनुक्रमानुसार ज्या शेतकऱ्याचा नंबर असेल अशा शेतकऱ्यांना ग्रेडरद्वारे फोन करून सांगितले जायचे व त्यांचेच धान खरेदी करीत असते. ही पद्धत एक - दीड महिना सुरळीत चालू होती. नंतर मात्र धान व्यापाऱ्यांनी ग्रेडर यांना हाताशी धरून आपलेच धान विकण्यास सुरुवात केली. त्यामुळे ज्या शेतकऱ्याचे नंबर अगोदर होते अशा शेतकऱ्यांना डावलून ज्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना सातबारा दिला अशाच शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात आले. 

यातून ग्रेडर मालामाल झाले आहेत. ज्या शेतकऱ्याचे धान घरीच पडून आहेत, अशा शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राचे ग्रेडर व अध्यक्ष यांना विचारणा केली असता ते गोडाऊन फुल्ल झाल्याचे सांगत आहेत. वैरागड येथील धानखरेदी केंद्रावर वैरागडसह वासाळा, वनखी व चामोर्शी ही गावे येतात. या गावांतील धानपिकांचे पुरामुळे तर वैरागड येथील पिकाचे तुडतुड्यांनी हल्ला केल्याने उत्पन्न अर्ध्यापेक्षा कमी झाले. असे असतानाही वैरागड येथे एवढी धान खरेदी झालीच कशी, असा प्रश्‍न येथील शेतकरी करीत आहेत. 

आमचे धान घ्यावे म्हणून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. परंतु त्याचा काहीही फायदा झालेला दिसत नाही. आरमोरी तालुक्‍यात नऊ धानखरेदी केंद्र असून तीन महिन्यांत 1 लाख 65 हजार 307 क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. यावरून वैरागडसह इतरही धानखरेदी केंद्रांवर बाहेर राज्यातील धान आणून विकण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणून या प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

कसे फेडणार कर्ज ?

बॅंकेकडून कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटीसही पाठविल्या आहेत. परंतु अजूनपर्यंत धान विकलेच नाही तर कर्ज कसे फेडायचे असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. बाहेर राज्यातील धानखरेदी केल्यास कार्यवाही करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. परंतु छत्तीसगड राज्यातून रात्रीच्यावेळी धान्याची आयात करून काही व्यापारी धानखरेदी केंद्रावर धान विकत आहेत. शेतकऱ्यांना दोन - तीन हजार रुपये देऊन काही व्यापारी आपली पोळी भाजून घेत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.