चंद्रपुरातील कार्पेट जाणार सातासमुद्रापार, विदेशात होणार विक्री; मूल, पोंभुर्णात कार्पेट प्रकल्प

चंद्रपूर : कार्पेट निर्मिती करताना महिला.
चंद्रपूर : कार्पेट निर्मिती करताना महिला.
Updated on

चंद्रपूर : कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांनी मात्र गरुडझेप घेतली आहे. जिल्ह्यातील मूल, पोंभुर्णा येथील कार्पेट निर्मिती प्रकल्पात महिलांनी तयार केलेल्या कार्पेटची विदेशवारी होण्याच्या दृष्टीने वाराणशीजवळ असलेल्या भदोई येथील दोन कंपन्या प्रयत्नशील आहेत. युरोप आणि अमेरिकेत या कार्पेटची विक्री कशा पद्धतीने करता येईल, या दृष्टीने या दोन्ही कंपन्या प्रयत्नरत आहेत. सध्या कार्पेटनिर्मिती केंद्रात ८० महिला कार्यरत आहेत. कार्पेट निर्मितीमुळे भविष्यात जिल्ह्यातील महिलांना रोजगाराचे नवे दालन खुले होणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, पोंभुर्णा या दोन्ही तालुक्‍यात धानासोबत कापूस, सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. शेतीतून साधारणतः चार महिने तालुक्‍यातील महिला मजुरांना रोजगार मिळतो. मात्र, त्यानंतर या दोन्ही तालुक्‍यांतील महिला, मजूर, कामगारांची रोजगारासाठी भटकंती सुरू होते. अशातच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकारातून या तालुक्‍यातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

चांदा ते बांदा या योजनेतून पोंभुर्णा, मूल येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्र उभे झाले. या प्रशिक्षण केंद्रातून महिलांना लोकरीपासून कार्पेट निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. महिलांचे प्रशिक्षण आटोपले आहे. लवकरच उत्पादनाला सुरुवात होणार होती. मात्र, कोरोनाचे संकट देशावर कोसळले. कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगाला वेठीस धरले. देश टाळेबंद झाला. लघु उद्योग बंद पडले. रोजगाराचा प्रश्‍न गंभीर झाला. टाळेबंदीत शिथिलता आल्यावर शासनाने सामाजिक अंतर राखून कार्पेट केंद्र सुरू करण्यास महिला आर्थिक विकास महामंडळास परवानगी दिली.

जाणून घ्या : बिबट्याने लावले वनविभागाला कामाला; ४८ तासांतच तीन जनावरांची शिकार

चांगल्या पद्धतीचे कार्पेट तयार

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत कार्पेट निर्मिती केंद्र सुरू झाले आहे. महिला चांगल्या पद्धतीने कार्पेट तयार करीत आहेत. त्याची दखल वाराणशीजवळ लागून असलेल्या भदोई येथील सूर्या कार्पेट, शारदा गोपीगंज या पुरवठादारांनी घेतली. त्यांनी या दोन्ही केंद्राला कार्पेटचे मोठे ऑर्डर दिले आहे. आता या दोन्ही कंपन्या चंद्रपूर जिल्ह्यात तयार झालेल्या कार्पेटची विदेशात कशी विक्री करता येईल, यादृष्टीने प्रयत्नशील आहे. या दोन्ही कंपन्यांनी विदेशातील काही कंपन्यांशी प्राथमिक चर्चा केली. तेथूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नरेश उगेमुगे यांनी दिली.

मूल, पोंभुर्णा विदेशात चमकेल

मूल आणि पोंभुर्णा या दोन तालुक्‍यांतील ८० महिला कार्पेट निर्मिती प्रकल्पात कार्यरत असून प्रत्येकीला ३०० रुपये रोज मजुरी मिळत आहे. या केंद्रात तयार झालेल्या कार्पेटला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विदेशात येथील कार्पेट जेव्हा विक्रीस जातील तेव्हा मूल, पोंभुर्णा या मागास तालुक्‍याचे नाव विदेशात चमकेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.

कार्पेट क्‍लस्टर सुरू
बचतगट महिला समुदायातील आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी कार्पेट क्‍लस्टर सुरू करण्यात आले आहे. कार्पेट क्‍लस्टर कौशल्य विकासाच्या माध्यमातून उद्योजकांच्या विकासाच्या संभाव्यतेचा शोध घेण्याबरोबर कायमस्वरूपी उत्पन्नावर स्वावलंबी होण्यास मदत करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
- नरेश उगेमुगे, जिल्हा विकास अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.