चंद्रपूर: महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मर्जीतील कंत्राटदाराच्या हितासाठी आडमार्गाने पाणीपुरवठ्याच्या कामाचे खासगीकरण करण्याचे कट कारस्थान रचले असल्याचा आरोप (भाजप वगळून) मनपाच्या सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी केला आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांनी अजूनपर्यंत याबाबत आपली भूमिका जाहीर केली नाही.
भाजपा सोडून सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी बुधवार (ता. २८) घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये पाणीपुरवठ्याच्या कंत्राटाबाबत खळबळजनक गौप्यस्फोट केला.
पाणीपुरवठ्याच्या एकाच कामासाठी एकाच वेळी तीन कंत्राट देण्याचा मनपाचा खटाटोप सुरू आहे, असा आरोप माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक दीपक जयस्वाल, विनोद लभाने, काँग्रेसचे अशोक नागपुरे, बापू अन्सारी, गोपाल अमृतकर, प्रदीप डे, मनोरंजन रॉय, प्रसन्न शिरवार, काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता अग्रवाल.
सकिना अन्सारी, विना खनके, शिवसेनेचे आकाश ऊर्फ पिंटू साखरखर, अपक्ष नगसेवक हनुमान चौखे यांची उपस्थिती होती.
तीन महिन्यांत एकाच कामासाठी तीन वेगवेगळ्या निविदा काढून तीन कंत्राटदारांची नेमणूक करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ‘एक फुल तीन माली’ असा प्रकार असल्याचा आरोप यावेळी देशमुख यांनी केला.
पाणीपुरवठा योजना चालविण्याकरिता नुकतीच एक निविदा प्रसिद्ध करण्यात आली. या निविदेमध्ये इरई धरण ते तुकूम जलशुद्धीकरण केंद्र ते बाबूपेठ-दाताळा सम-वेल येथील सर्व यंत्रसामुग्री-उपकरणे चालविणे, त्यांची देखभाल व दुरुस्ती करणे अशा कामांचा स्पष्ट उल्लेख आहे.
शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची संपूर्ण जबाबदारी सदर कंत्राटदाराकडे असल्यामुळे पाईपलाईनची देखभाल-दुरुस्ती, गळतीचे काम, तसेच सर्व यंत्रसामग्री-उपकरणांची विद्युत व यांत्रिकी देखभाल दुरुस्ती त्याच कंत्राटदाराने करणे अपेक्षित आहे.
मात्र, महानगरपालिकेने एप्रिल २०२३ मध्ये पाइपलाइन जोडणी, गळती दुरुस्ती इत्यादीसाठी एक वेगळी निविदा काढलेली आहे.
ती अंतिम टप्प्यात आहे. मे २०२३ मध्ये पाणीपुरवठा योजनेतील विद्युत व यांत्रिकीच्या देखभाल दुरुस्तीकरिता कंत्राट देण्यासाठी पुन्हा एक निविदा मनपा प्रशासनाने काढली. या दोन्ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून कमी दराच्या कंत्राटदारांची निवडसुद्धा झालेली आहे.
एकाच कामासाठी तीन कंत्राटदार नेमण्याचा अनोखा विक्रम मनपा प्रशासन करीत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये देशमुख यांनी केला.
कंत्राटी पद्धतीला बगल
मनपाच्या विशेष सभेने कंत्राट रद्द करून पाणीपुरवठा योजना चालविण्याचा निर्णय घेतल्यानंतर मागील तीन वर्ष कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांचे नेमणूक करण्यात येत आहे.
मात्र, या पद्धतीला बगल देऊन संपूर्ण योजना चालविण्याचे व देखभाल दुरुस्तीचे काम एकाच कंत्राटदाराला देण्याचा हेतू म्हणजे आडमार्गाने पाणीपुरवठा योजनेचे खाजगीकरणच असल्याचा सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी केला.
याबाबत आयुक्त पालीवाल सार्वजनिकरित्या प्रसिद्धी माध्यमांसोबत धांदात खोटे बोलत असल्याची टिपणी माजी नगरसेवकांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.