वणी (जि. यवतमाळ) : नवरगाव शिवारात जिवंत वीजतारेला स्पर्श झाल्याने सालगड्याचा १३ ऑगस्टला मृत्यू झाला होता. या घटनेस जबाबदार धरून शेतमालकाला काही व्यक्तींनी नाहक त्रास दिला. त्यामुळे त्यांनी २४ ऑगस्टला विषप्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे.
प्रभाकर भोयर असे मृत शेतमालकाचे नाव असून, ते वणी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी विवेक तोटावार या संशयिताला अटक केली आहे. नवरगाव येथे भोयर यांची शेती आहे. या शेतीची देखभाल करण्यासाठी विलास मोहुर्ले हे मागील अनेक वर्षांपासून सालगडी होते. घटनेच्या दिवशी सालगडी शेतात गेले असता जमिनीवर पडलेल्या जिवंत वीजतारेचा त्यांना स्पर्श झाला. त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मृत विलासचे नातेवाईक व वणी येथील काही व्यक्ती हेतुपरस्सर शेतमालकालाच जबाबदार धरत होते. सातत्याने होत असलेल्या छळामुळे प्रभाकर भोयर यांनी २४ ऑगस्टला शेतात विषप्राशन केले. त्यांना तातडीने उपचारार्थ वणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूर येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने नऊ सप्टेंबरला त्यांचा मृत्यू झाला.
भोयर यांच्या नातेवाईकांनी शिरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, कारवाईस विलंब होत असल्याने नातेवाईकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना साकडे घातले. तांत्रिक कारणामुळे गुन्हा नोंदविण्यात अडचण येत होती.
अखेर शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले, पीएसआय ज्ञानेश्वर ढवळे यांनी सर्व बाबी तपासून मृत्यूस कारणीभूत असलेल्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्यात एकाला अटक करण्यात आली असून, गोपनियतेअभावी अन्य पाच ते सहा जणांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत. या कारवाईमुळे वणीत खळबळ उडाली आहे.
सालगड्याचा मृत्यू झाला. त्यामुळे व्यथित झालेल्या प्रभाकर भोयर यांनी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली. असे नातेवाईकांनी गृहीत धरले होते. मात्र, भोयर यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी चिठ्ठी नातेवाईकांच्या हाती लागली. त्यात कुणीकुणी त्रास दिला. त्यांची नावे नमूद होती. हा प्रकार समोर येताच नातेवाईकांना धक्का बसला आणि रितसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मृताच्या हस्ताक्षराचे नमूने तपासण्यात आले. सर्व बाबींची पडताळणी केल्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
संपादन - नीलेश डाखोरे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.