चिखली (जि.बुलडाणा) : कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे संबंध जगातील नागरिकांचे आरोग्य आजमितीस धोक्यात आलेले दिसत असतांनसुद्धा नागरिक त्यास गंभीरपणे घेत नसून चिखली शहरात लॉकडाउनचा फज्जा उडालेला दिसून येत आहे. शहरामध्ये सर्वत्र ठिकाणी राजरोसपणे तसेच मुक्तपणे वाहतूक होत असून नागरिकांना बाहेर पडण्याकरिता कुठल्याही प्रकारची भीती दिसत नाही. त्यामुळे शहरात लॉकडाउन आहे की नाही असा प्रकार 29 एप्रिलला पहावयास मिळाला असून चिखलीकरांच्या आरोग्यास हे घातक ठरू शकते.
कोरोना आजाराला तोंड देत त्याचा नायनाट करण्याच्या हेतुने समस्त पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन, आरोग्य प्रशासनासह राज्यातील नगर पालिका, त्यांचे कर्मचारी खांद्याला खांदा लावून कठीण परिस्थितीतही परिश्रम घेत आहेत. शहरातील प्रत्येक भागात औषधाची फवारणी करणे, नव्याने आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांना विलगीकरणाचे शिक्के मारणे, शहरात येणार्या नागरिकांवर लक्ष ठेवत नाकेबंदी करणे, त्यांच्या नोंदी ठेवणे, शहरात नागरिकांची गर्दी होऊ नये याकरिता जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे अशी कामे प्रत्येक पालिका कर्मचारी स्वत: मुख्याधिकार्यांसह 24 तास करीत आहेत.
मात्र नागरिकांनी या सर्व कामांना सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील यात शंका नाही. शहरात लॉकडाऊनचा पुरता फज्जा उडाला असून येथील नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. सध्या कोरोना व्हायरसमुळे देशासह राज्यात लॉकडाऊन असून देशासह राज्यात संचारबंदी जमावबंदी लागू आहे. सध्या राज्यासह देशातील ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणात लॉक डाऊन करण्यात आलेले असताना मात्र चिखली मध्ये कुठेही नियमाचे पालन होताना दिसत नाही. बिनदिक्कत पणे नागरिक रस्त्यावर येत असून नागरिकांना कोरोना या महामारीचे गांभीर्य नसल्याचे यावरून दिसून येत आहेत.
आवश्यक वाचा - बापरे! हा जिल्हा झाला कोरोनामुक्त; मात्र, ओढावले नवे संकट
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, जयस्तंभ चौक परिसर, डी.पी. रोड, नवीन डी.पी. रोड यासह शहरातील मुख्य रस्त्यासह अनेक ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. जीवनावश्यक साहित्याची खरेदी करताना नागरिकांना कोरोना संसर्ग होण्याची भीती, सोशल डिस्टन्सिंग याचाही विसर पडला आहे. पोलिसांची वाहन आल्यावर नागरिक आप-आपल्या घरात जाऊन बसताना तर काही आपली उघडी दुकाने बंद करताना दिसतात. मात्र, प्रशासकीय वाहन किंवा पोलिसांची वाहन तेथून गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात घोळका करून नागरिक बसताना व रस्त्यावर विनाकारण आपल्या वाहनांवर फिरताना दिसत आहेत. या विनाकारण फिरणार्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीसुद्धा नागरिकांमधून होत आहे.
बँकांसमोर महिलांची मोठी रांग
चिखलीतील स्टेट बैंक ऑफ इंडिया, बैंक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया समोर सोशल डिस्टन्सचा फज्जा दिसून येत आहे. शेकडो महिलांची बँकेबाहेर भर उन्हात गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. सर्वसामान्य कुटुंबाचे हाल होऊ नये म्हणून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी केंद्र सरकारकडून देशभरातील लाखो महिलांच्या जनधन खात्यात प्रत्येकी पाचशे रुपयांची रक्कम ही सरकारकडून टाकण्यात आली आहे. दरम्यान, आता ती रक्कम काढण्यासाठी स्टेट बैंक ऑफ इंडिया आणि बैंक ऑफ महाराष्ट्र समोर शेकडो महिलांनी गर्दी केली आहे. येथे सोशल डस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.