राजनगरी अहेरीत लॉकडाउनचे तीनतेरा...बिनधास्त फिरताहेत निर्ढावलेले नागरिक

अहेरी : येथील बॅंकेत लोकांनी केलेली गर्दी.
अहेरी : येथील बॅंकेत लोकांनी केलेली गर्दी.
Updated on

अहेरी (जि. गडचिरोली) : देशभर कोरोनाचे रुग्ण आढळूनही बऱ्याच मोठ्या कालावधीत जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. तेव्हा नागरिकांनी जनता कर्फ्यू व लॉकडाउनच्या नियमांचे तंतोतंत पालन केले. पण, आता रुग्णसंख्या वाढत असताना राजनगरी अहेरीतील नागरिक निर्ढावल्यासारखे दिसत आहेत. अनेक ठिकाणी लोकांची गर्दी होत आहे. कोरोनाशी त्यांचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे.

अहेरीत आता बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे हळूहळू रुग्ण आढळायला सुरुवात झाली आहे. अहेरीत आढळलेल्या पहिल्या रुग्णाचा स्रोत अद्याप न कळल्याने भीती कायमच आहे. बहुतांश बाहेरून येणाऱ्या व्यक्ती संस्थात्मक विलगीकरण कक्षात जायचे टाळत आहेत. संस्थात्मक विलगीकरण कक्षात जायला नागरिक घाबरत आहेत. तसे पाहता अहेरीतले विलगीकरण कक्ष अद्ययावत सोयीसुविधायुक्त आहे. सर्वच इमारती नवीन असून आरोग्यपूर्ण वातावरणात आहेत. तरीही विलगीकरणाबाबत भ्रामक कल्पना बाळगून नागरिक जात नाहीत.

बरेच नागरिक बाहेरून आल्याची माहिती देत नाहीत, तर कुणी प्रवासातल्या टप्प्यांची माहिती देत नाहीत. काहीजण संपर्कात आलेल्या लोकांची नीट माहिती देत नाहीत. रुग्ण आढळल्यास प्रशासनाला या अडचणींमुळे स्रोत शोधणे अवघड होत आहे. त्यामुळे एक छोटीशी चूक फार मोठी समस्या बनून जाते.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

अहेरीत एवढ्या गंभीर वातावरणात तथाकथित सुशिक्षित शेकडोंच्या संख्येत जेवणावळीचे आयोजन करून कळसच गाठत आहेत. जेवण मांसाहारी असेल तर कोरोनालाही न घाबरता जाणारे महाभागही तेवढेच आहेत. नुकताच अहेरीत आढळलेल्या रुग्णाने अशा जेवणावळीत उपस्थिती दर्शविल्याची चर्चा आहे. मुख्य बाजार, भाजी बाजार, कृषी केंद्र आणि बॅंका या सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला असतो. सर्वच गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेमार्फत नियोजन केलेले आढळत नाही.

प्रशासनाचे ढिसाळ नियोजन

संपूर्ण नगरात निर्जंतुकीकरण मोहीम आजवर फक्त एकदाच तीसुद्धा केवळ मुख्य रस्त्यावर राबविण्यात आली. हॅण्डवॉश स्टेशन नादुरुस्त असून साबण संपलेलेच असते. ऐन पावसाळ्यातही प्रशासनाचे ढिसाळ धोरण नागरिकांच्या जिवावर बेतू शकते. तालुकातील छल्लेवाडासारख्या ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा शिरकाव झाल्याचे सुत्राद्वारे कळते. बरेच संशयित बाहेर फिरत असल्याने संक्रमण अतिशय वेगाने होऊन लवकरच उद्रेक होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.


अन्‌ तहसीलदार म्हणतात परिस्थिती नियंत्रणात

तहसीलदार ओंकार ओतारी यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, प्रशासन तयार असून विलगीकरण केंद्राची क्षमता आजघडीला 850 व्यक्ती एवढी आहे. सध्या सर्वच विलगीकरण कक्ष सक्रिय आहेत. परगावातून आलेल्यांना थेट विलगीकरण केंद्रात पाठविण्याचे निर्देश नगरपंचायत, ग्रामपंचायत, आरोग्य व इतर सर्व विभागांना देण्यात आले आहेत. नागरिकांनीही सर्व सूचनांचे पालन केल्यास भीती बाळगण्याची गरज नाही. परिस्थिती सध्यातरी नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.