महागाव (जि. यवतमाळ) : आतापर्यंत कपाशीचा एकच वेचा झाला. आता शेतांत बोंडही उरले नाही. कापूस वेचण्याची गरज उरली नाही. घरात कापसाचे बोंड शिल्लक नाही. अन् शिवार उलंगलंय. तालुक्यातील कापूस उत्पादकांची ही आभाळवेदना विधान परिषदेचे आमदार व कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांनी प्रत्यक्ष अनुभवली.
यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे बोंडअळी व बोंडसडमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावरही संक्रांत दिसत आहे. परतीच्या पावसाने सोयाबीनही हातचे गेले आहे. वीस वर्षांत उद्भवली नसेल इतकी वाईट परिस्थिती यंदा निर्माण झाली आहे. कोविडसोबतच पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहे. शेतकरी बांधव पुरते हतबल झाले आहेत.
या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिर्झा बुधवारी स्वत: महागाव तालुक्यातील बांधावर पोहोचले. त्यांनी तालुक्यातील काही गावांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. यंदा कपाशीचे पीक शंभर टक्के प्रभावित झाले आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याची हमी दिली. पिंपळगाव शिवारात श्याम ताराचंद आडे या शेतकऱ्याच्या शेतात झालेली कपाशीची दुर्दशा आमदार मिर्झा यांनी अनुभवली.
सारकिन्ही येथील प्रकाश अनुसे, माळकिन्ही येथील अशोक कलाने, लेवा येथील मनीष देशमुख, तिवरंग येथील प्रभाकर राठोड, कासारबेहळ शिवारातील बसू पावडे आदी शेतकऱ्यांच्या शेतात त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वनमाला राठोड, कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, प्रज्ञानंद खडसे, आरिफ सुरय्या, शैलेश कोपरकर, स्वप्नील नाईक,
गजानन कांबळे, इरफान सय्यद, डॉ. अरुण पाटील, वामनराव देशमुख, महेंद्र कावळे, नायब तहसीलदार संतोष अदमुलवाड, तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे, मंडळ कृषी अधिकारी कैलास राठोड आदी उपस्थित होते. तालुक्यातील टेंभी व काळी येथील दोन उच्चशिक्षित युवकांनी नुकतीच आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबांनाही भेट देऊन डॉ. मिर्झा यांनी सांत्वन केले.
आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी केली. त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवाराची भकास अवस्था दाखविली. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनाही त्यांनी दूरध्वनीवरून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या संवेदना ऐकविल्या. महागाव तालुक्यात तातडीने सर्वेक्षण सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.