सडक अर्जुनी (गोंदिया) : बैल, सर्जाराजाप्रती प्रेम व्यक्त करण्याचा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा बैलपोळा सण मंगळवारी (ता. १८) आहे. परंतु, यंदा या सणावर कोरोनारूपी बंधन आले आहे. अत्यंत साधेपणाने घरीच बैलांची पूजा करून हा सण साजरा करावा लागणार आहे. यातही गावाच्या आखरावर दरवर्षी या दिवशी झडणाऱ्या झडत्यांचा आवाज यंदा घुमणार नाही.
देशाने औद्योगिक क्षेत्रात कितीही प्रगती केली असली; तरी शेती हेच वैभव आहे. शेतकऱ्यांचे खरे दैवत बैलच आहेत. बैलजोडीच्या माध्यमातून शेतीची व इतर कामे शेतकरी करतो. ज्या बैलजोडीने वर्षभर सहकार्य केले, त्याचा सण मोठ्या उत्साहाने वर्षातून एकदा साजरा करतो. परंतु, यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पोळा सणाचा बेरंग झाला आहे.
दरवर्षी पंधरा दिवसांपासून पोळ्यानिमित्त रंग, बेगड विक्रीसाठी दुकाने लागायची. पण यावर्षी दोन-तीन दिवसांपूर्वी दुकाने लागली. बैलांना सजविण्यासाठी रंग, बेगड, घुंगरू, नवीन झूल आदी साहित्य शेतकरी विकत घेऊन बैलांना सजवत पोळा भरण्याच्या ठिकाणी घेऊन जात असत. मात्र, यावर्षी या सर्वांवर पाणी फेरले गेले आहे.
बैलपोळ्यासह मारबत व तान्हा पोळा सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. कोणत्याही गावात किंवा शहरात बैलपोळा भरवण्यात येऊ नये, शेतकऱ्यांनी त्यांचे बैल सजवून घरीच पूजा करावी, मारबतची मिरवणूक काढू नये, तसेच तान्हा पोळ्यानिमित्त होणारी लाकडी बैल सजावट स्पर्धा, मिरवणुका, शोभायात्रा यावर निर्बंध आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाच्या वतीने तसे आदेश काढण्यात आले आहे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, पोळ्याच्या सणातही शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे. मूठभर सधन शेतकरी सोडले तर बाकीचे दारिद्र्यात जीवन जगत आहेत. पोळ्याच्या दिवशी शेतकरी चिंतातुर आहेत. कोरोनामुळे बैलांना सजविण्याचे रंग, बेगड आदी साहित्य महागले आहेत. साहित्य कसे घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. स्वातंत्र्यानंतर हरितक्रांती झाली पण शेतकऱ्यांच्या जीवनात फारसा बदल झाला नाही.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासनाने लादलेल्या नियम व अटींच्या अधीन राहून बैलपोळा, तान्हा पोळा व मारबतीचा सण घरीच साजरा करावा, सार्वजनिक ठिकाणी तोरण बांधू नये, गर्दी करू नये, असे आवाहन गावागावांत दवंडीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
दरवर्षी पंधरा दिवसांपासून बाजारपेठा रंग, बेगड, बैलांचे श्रुंगार, लाकडी नंदी बैलांनी भरगच्च भरून असायच्या. विक्रेत्यांच्या रांगांच्या रांगा दिसायच्या. मात्र, यावर्षी हे चित्र दिसले नाही. दोन-चार विक्रेते फुटपाथवर ही साहित्य विक्रीसाठी ठेवून होते. मात्र, सण साजरा करण्यावर निर्बंध असल्याने शेतकरी ग्राहक क्वचित ही साहित्य खरेदी करताना दिसला. कित्येक विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.