यवतमाळ : सातबारा देण्यापासून तर नोकरी लावून देण्यापर्यंतच्या प्रत्येक कामांसाठी चिरीमिरी घेण्याचा पायंडा प्रतिष्ठित झाला आहे. त्यातही लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे निलंबितच केले जात नाही. एसीबीने निलंबनाची शिफारस केल्यानंतर असे दीडशे अधिकारी उजळ माथ्याने नोकरीत कायम आहेत. त्यामुळे लाचखोरांमध्ये ‘आम्हाला काय कुणाची भीती’ अशी गुर्मी वाढत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत केलेल्या सापळा कारवाईचा अहवाल जाहीर केला आहे. या आठ महिन्यात ७५४ लाचखोरांना पकडण्यात आले. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून लाचखोरी पकडलेल्या १५५ जणांना अद्यापही निलंबितच करण्यात आलेले नाही, अशी खंत वजा नोंदही या अहवालात करण्यात आली आहे. एसीबीने यातील काही जणांच्या निलंबनाची शिफारस २०१८ मध्ये तर काही जणांची शिफारस २०१९ मध्ये त्या-त्या विभागप्रमुखांकडे केली आहे. परंतु या वरिष्ठांनी लाचखोरांवर आपला वरदहस्त कायम ठेवला असून हे लाचखोर नोकरीत कायम आहेत. त्यामुळे सरकारी कार्यालयात कामांसाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक होतच आहे.