अमरावती : पांढऱ्या सोन्याच्या खासगी खरेदीस सुरुवात झाली असली तरी यंदा बोंडअळीने केलेल्या हल्ल्यात प्रत घसरल्याने हमीदरापेक्षा कमी दर शेतकऱ्यांच्या पदरी पडू लागला आहे. शासनाने 21 नोव्हेंबरपासून खरेदी सुरू करण्याची घोषणा केली असून सध्या खुल्या बाजारात कापसाला 5,200 ते 5,400 रुपये प्रती क्विंटल भाव मिळू लागला आहे.
उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यात यंदा 2 लाख 44 हजार हेक्टर क्षेत्रात कापसाचा पेरा आहे. सरासरीने तो 117 टक्के आहे. कापसाच्या उत्पादनाला पोषक असे वातावरण असताना व उत्पादनाची सरासरी वाढेल, असा अंदाज असताना बोंडअळी व बोंडसडच्या हल्ल्याने या पिकाची हानी केली आहे. उत्पादनाच्या सरासरीसोबतच कापसाची प्रत घसरली आहे. शासनाने यंदा लांब धाग्याच्या कापसाला 5,825, तर मध्यम धाग्याच्या कापसाला 5,515 रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर केला आहे. कापसाचे पीक घरात आले असून दसऱ्याला खासगी जिनिंग प्रेसिंगने खरेदी प्रारंभ केली. बोंडअळी व बोंडसडपासून वाचविलेला कापूस बाजारात विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणला आहे. अमरावती जिल्ह्यातील खासगी केंद्रावर कापसाला 5,200 ते 5,400 रुपये भाव मिळू लागला आहे. हमीदराच्या तुलनेत हा दर कमी असला तरी आर्थिक निकडीपायी व शासकीय खरेदीला विलंब असल्याने शेतकऱ्यांनी तो विकण्याची तयारी केली आहे.
अतिपावसाने मार खाल्ल्यानंतर बोंडअळी व बोंडसडच्या तडाख्यात सापडलेल्या कापसाची प्रत खालावल्याचे कारण खासगी खरेदीदारांनी दिले आहे. कापसात पिवळेपणा अधिक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. हमीदर मिळण्यासाठी प्रत 31 पेक्षा अधिक असावी असेही त्यांनी सांगितले.
आवक नगण्य -
कापूस खरेदीची खासगी केंद्र सुरू झाली असली तरी या केंद्रांवर कापसाची आवक मात्र नगण्य आहे. दसऱ्यापासून दरवर्षी खरेदी सुरू केल्या जाते. यंदाही केंद्र सुरू केले आहे. मात्र, यंदा उत्पादन कमी असून केंद्रांवर आवकही सध्या नगण्य आहे. सध्या कापसाला 5200 ते 5400 रुपये भाव दिला जात आहे, असे गंगा कॉटनचे संचालक अनिल पनापालीया यांनी सांगितले.
शासकीय केंद्रांची प्रतीक्षा -
पणन महासंघाची कापूस खरेदी केंद्र 21 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. हमीदरासाठी या केंद्रांची प्रतीक्षा आहे. सीसीआयनेही खरेदी लवकर सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पणनची जिल्ह्यात चार केंद्र सुरू होणार असून ती कमी पडतील, असा अंदाज आहे. याशिवाय प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव यामुळे कापूस खरेदीत अडचणी जाण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.