विदर्भातील कापसाचे उत्पादन पाहता ‘कापूस ते कापड’ असे स्वप्न समोर ठेवले. या धोरणातूनच महाराष्ट्रात एकाधिकार योजना समोर आली.
अमरावती - विदर्भातील (Vidarbha) कापसाचे उत्पादन (Cotton Production) पाहता ‘कापूस ते कापड’ असे स्वप्न (Dream) समोर ठेवले. या धोरणातूनच महाराष्ट्रात एकाधिकार योजना समोर आली. मात्र, स्थानिक पातळीवर प्रक्रिया केंद्र उभेच झाले नाही. विदर्भात कापसाचे उत्पादन अधिक, मात्र गिरण्या पश्चिम महाराष्ट्रात... अशा विचित्र निर्णयामुळे प्रक्रिया उद्योग निर्माण झाले नाही व त्यामुळेच ‘कापूस ते कापड’ हे स्वप्न ठरू लागले आहे.
राज्यातील विदर्भ, मराठवाडा व खान्देश हा कापूस उत्पादकांचा पट्टा आहे. राज्यात यंदा कापसाच्या लागवडीखालील सरासरी ४१.८४ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ३९.५४ लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची पेरणी झाली. खरीप हंगामातील १४५.९ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २७ टक्के क्षेत्र कापसाने व्यापले होते. गेल्या एक शतकापेक्षा अधिक काळ कापसाच्या शेतीने या भागातील अर्थकारणावर वर्चस्व ठेवले आहे. लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात बरेवाईट व चांगलेही दिवस आणलेत.
१९७२ मध्ये कापूस एकाधिकार योजनेच्या माध्यमातून कापूस उत्पादकांना साखर कारखान्यांच्या पार्श्र्वभूमीवर ‘कापूस ते कापड’ असे स्वप्न दाखविले गेले. विदर्भात कापूस उत्पादित होत असला तरी स्थानिक पातळीवर ‘कापूस ते कापड’ यासाठी लागणारे प्रक्रिया उद्योग तयारच झाले नाहीत. गाठी बांधण्यापुरत्या जिनिंग प्रेसिंग आहेत. सुतासाठीच्या सहकारी सूतगिरण्या आहेत त्या आचके खात आहेत. अनेक अवसायनात गेल्या आहेत. अमरावतीला टेक्स्टाईल पार्क आहे, मात्र त्यासाठी लागणारा कच्चा माल बाहेरूनच येतो. विदर्भातील मॉडेल, एम्प्रेस, विजय व विदर्भ मिल बंद पडल्यात. सद्यस्थितीत विदर्भातील दहा जिल्ह्यांत ८४ खासगी प्रक्रिया उद्योग आहेत. त्यातील काही बंद आहेत. तर सुरू असलेल्या प्रकल्पातून धाग्याचेच अधिक उत्पादन होते. त्यामुळे ‘कापूस ते कापड’ हे कापूस उत्पादकांसाठी स्वप्नच ठरले आहे.
स्थानिक पातळीवर या उद्योगांना चालना मिळाल्यास व शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची, गुणवत्तेची बियाणे मिळाल्यास उत्पादकता वाढून त्याचा लाभ सर्वच क्षेत्राना होऊ शकणार आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने ते स्वप्नच ठरू लागली आहे. शेतीक्षेत्रात नवे संशोधन नाही व प्रक्रिया उद्योगांना चालना देता येईल, अशा पायाभूत सुविधा नाहीत.
‘कापूस ते कापड’ असा प्रक्रिया उद्योग उभे होण्याची गरज आहे. तसे झाले तरच कापसाच्या शेतीला व शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ शकणार आहेत.
- प्रवीण भुजाडे, जिनिंग-प्रेसिंग व्यावसायिक.
पांढरे सोने
ब्रिटिशांच्या काळात कापूस व सोनं याची बरोबरी होत होती. त्यानंतर १९७२ मध्ये कापसाचा भाव २५० रुपये प्रतिक्विंटल असा होता; तर, सोन्याचाही त्यावेळीचा भाव प्रती तोळा २५० रुपये इतकाच होता. त्यामुळे कापसाला पांढरं सोनं म्हटल्या जाऊ लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.