अंकिता जळीतकांड : पहिल्याच दिवशी आरोपीचे वकील गैरहजर; गुरुवारी देतील आरोपावर उत्तर

Court proceedings on Ankita pisudde arson case resumed
Court proceedings on Ankita pisudde arson case resumed
Updated on

हिंगणघाट (जि. वर्धा) : येथील बहुचर्चित अंकिता जळीतकांडावर न्यायालयीन कामकाज सुरू झाले. पहिल्यादिवशी आरोपीचे वकील हजर नसल्याने आरोपीवर असलेल्या आरोपाला उत्तर देण्यात आले नाही. यामुळे न्यायालयाने याकरिता १७ डिसेंबर ही तारीख दिली आहे. या दिवशी आरोपी विकेश नगराळेचे वकील दाखल आरोपांना उत्तर देतील असे ॲड. उज्वल निकम यांनी सांगितले.

बहुचर्चित अंकिता जळीतकांडाची न्यायालयीन प्रक्रिया सोमवारपासून प्रारंभ झाली. पहिल्या दिवशी शासकीय अभियोक्‍ता उज्वल निकम न्यायालयात उपस्थित होते. कामकाज संपल्यानंतर माहिती देताना ॲड. उज्वल निकम म्हणाले, या प्रकरणात १५ दिवसांत प्रत्यक्ष सुनावणी करण्यासंदर्भात न्यायालयाने परवानगी दिली आहे. साक्षीपुरावे जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातील सुरू होईल.

अंकिता जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे याच्यावर त्याच्या उपस्थितीत हिंगणघाटच्या न्यायालयात त्याने केलेल्या गुन्ह्याचे आरोप प्रस्तावित करण्यात आले. हिंगणघाटच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश श्री. माजगावकर यांच्या न्यायालयात या बहुचर्चित प्रकरणाची आज तारीख होती.

या प्रकरणासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील उज्वल निकम न्यायालयात हजर असल्याने नागरिकांनी गर्दी केली होती. यामुळे न्यायालयाच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

न्यायालयात प्रकरणावर सुनावणी होत असताना ॲड. उज्वल निकम यांनी हिंगणघाट येथे असलेली परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्‍यता असल्याने प्रकरण वर्ध्याच्या न्यायालयात चालविण्याची परवानगी देण्याची मागणी केली. यावर न्यायाधीशांनी या प्रकरणात येथे यापूर्वी सुनावणी झाली असल्याने हे प्रकरण येथेच सुरू राहील असे उत्तर दिल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली.

आरोपीला हजर करण्यास विलंब

उज्वल निकम यांचे सकाळी १०.३० वाजता हिंगणघाटच्या विश्रामगृहात आगमन झाले. यानंतर ११.२२ वाजता ते सत्र न्यायाधीश श्री. माजगावकर यांच्या न्यायालयात हजर झाले. मात्र, आरोपी विकेश नगराळे याला नागपूरच्या कारागृहातून हिंगणघाट न्यायालयात हजर करण्यास विलंब झाला. दुपारी १२ वाजता कडेकोट पोलिस बंदोबस्तात आरोपी विकेश नगराळेला घेऊन पोलिस पथक न्यायालयात दाखल झाले. त्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला प्रारंभ झाला. आरोपीचे वकील आज उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीत आरोपी समक्ष त्याच्यावर असलेले आरोप प्रस्तावित करून दुपारी १ वाजताच्या दरम्यान कामकाज संपले.

ॲड. निकम यांचे वकिलांना मार्गदर्शन

आरोपी येण्यास विलंब झाल्याने दरम्यानच्या काळात ॲड. उज्वल निकम यांनी स्थानिक वकिलांच्या हिंगणघाट बार असोसिएशनला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. तेथे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अशोक काकडे व सचिव ॲड. अर्सी मोहम्मद यांनी त्यांचे स्वागत केले.

राज्य शासनाचा क्रांतिकारी निर्णय

राज्य शासन या अधिवेशनात महिला संदर्भात दिशा नव्हे तर शक्ती कायद्याचे विधेयक मांडण्याची शक्‍यता आहे. हा कठोर कायदा संमत झाल्यास महिलांवरील अत्याचाराला चाप बसेल. हा कायदा येथे मंजूर झाल्यावर तो केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल. महिलांचे सबलीकरण व्हावे व महिलांच्या अत्याचाराला जरब बसावी याच्या कठोर तरतुदी या कायद्यात करण्यात आलेल्या आहेत. राज्य शासनाचा हा क्रांतीकारी निर्णय असून बलात्कार, विनयभंग व रासायनिक तज्ज्ञांचा अहवाल त्वरीत मिळण्याबाबतच्या तरतुदी या कायद्यात करण्यात आल्या आहेत. या कायद्यामुळे महिलांविरोधात समाजमाध्यमावर जे आक्षेपार्ह लिहिल्या जाते त्याला देखील पायबंद बसेल असेही ते म्हणाले.

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()