बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : रेल्वे प्रवासादरम्यान हैदराबाद येथील एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत अधिकारी बेपत्ता झाला. तब्बल चार दिवसांनी त्याचा मृतदेह रविवारी (ता. ७) विरुर रेल्वेस्थानकाजवळ आढळला. मृताचे नाव कुशल सुरेंद्र खत्री आहे. या घटनेची माहिती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना दिली होती. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार तपास सुरू होता. मूळचे बडनेरा येथील कुशल सुरेंद्र खत्री हे हैदराबाद येथील एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी होते. राखी असल्याने ते पत्नी खुशबूला घेऊन ३ ऑगस्टला हैदराबाद येथून हिस्सार एक्स्प्रेसने बडनेरा येथे जाण्यासाठी निघाले होते. रात्रीचा प्रवास असल्याने खत्री कुटुंब झोपी गेले. सकाळी सहाच्या सुमारास रेल्वे बल्लारपूर स्थानकावर आली. झोपेतून जागे झालेल्या खुशबू खत्री यांना पती रेल्वेत दिसले नाही.
त्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे खुशबू बडनेरा येथील रेल्वे पोलिस चौकीत तक्रार दाखल केली. या घटनेनंतर खत्री यांच्या नातेवाइकांनी शोधमोहीम सुरू केली. खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून या घटनेची माहिती दिली. वरिष्ठांच्या आदेशावरून तपासाचे चक्र बडनेरा ते बल्लारपूरपर्यंत पोहोचले. सर्वत्र शोधमोहीम सुरू असतानाच रविवारी (ता. ७) सकाळी नऊदरम्यान विरुर रेल्वेस्थानकाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. हा मृतदेह कुशल खत्री यांचा असल्याचे दिसून आले. खत्री कुटुंब विरुर येथे पोहोचले. शव छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्यामुळे कुटुंबीयांनी इन कॅमेरा शवविच्छेदन अहवालाची मागणी केली. अहवालानंतर ही दुर्घटना की घातपात, हे निष्पन्न होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.