नागपूर : पुरवठादारांचे थकीत बिल मंजूर होत नसल्याने मेडिकलमधील विविध वस्तूंचा पुरवठा थांबतो. 31 मार्चपर्यंत कोणतीही साधनसामग्री खरेदी करू नका, असे शासनाचे आदेश आल्याने हजारो रुग्णांना फटका बसत आहे. नुकतेच थायरॉईड किट संपल्याने महिला रुग्णांना दररोज खासगीचा रस्ता दाखवला जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
मेडिकलमध्ये वर्षभरात तीन लाखांहून अधिक चाचण्या होतात. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रसायन (केमिकल) लागते. रुग्णांच्या निदानासाठी लागणारे रिऐजन्ट-केमिकल (रसायन) उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. थायरॉईडची चाचणी करणारे "सिमेन्स' कंपनीचे यंत्र मिळाले. परंतु, केमिकलची (रिऐजन्ट) एक कोटीची बिले थकीत असल्याने यंत्रदेखील बंद आहे. याचा मनस्ताप रुग्णांना होतो.
गर्भवती मातांना थायरॉईड चाचणी करणे सक्तीचे आहे. थायरॉईड हायपर आणि हायपो दोन प्रकारात असतो. त्यातल्या पहिल्या प्रकारात रुग्णांना अस्वस्थता, हृदयाचे ठोके वाढतात. वजन कमी होते. अतिसार होतो. डोळ्यांचा आकार वाढतो. उच्च रक्तदाबाचाही त्रास होतो. तर दुसऱ्या प्रकारात थकवा येऊन चक्कर येते. वजन वाढते. मलावरोध होऊन पोट साफ होत नाही. या दोन्ही प्रकारात उपचाराचे निदान करणे आवश्यक असते. गर्भवतींमध्ये सकस आहार तसेच आयोडिनची कमतरता असल्याने थायरॉईड होण्याची शक्यता असते. गर्भवती असताना या आजाराचा परिणाम बाळावर होऊ नये यासाठी ही चाचणी सक्तीची असते. एक हजारात 80 महिला थायरॉईडने ग्रस्त असतात. शासनाने नुकतेच फेब्रुवारीमध्ये राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना कोणतीही साधनसामग्री खरेदी करू नका, असे सांगितले. त्यामुळे थायरॉईड किटची खरेदी थांबली आहे. यामुळे दररोज शेकडो महिला या चाचणीपासून वंचित आहेत.
नावालाच सुपर
मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने किडनी प्रत्यारोपणाचा पल्ला गाठला. हृदयावरील बायपासपासून तर एन्अिजोप्लास्टीमध्ये आघाडीवर आहे. पोटाचे विकार आणि मेंदू विकारग्रस्तांसाठी सुपर वरदान ठरत आहे. येथील पॅथॉलॉजी आणि जीवरसायन विभागात उत्तम काम होत असल्याचे दिसून येते. मात्र "थायरॉईड' निदानाची सोय नाही. सुपरमध्ये तंत्रज्ञ नसल्याने नाइलाजास्तव गरीब रुग्णांना येथेही खासगीचा रस्ता दाखविला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.