यवतमाळ : जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर 40 तासांचे 'मिनी लॉकडाउन' करण्यात आले. सोमवार (ता.एक) पासून आठ मार्चपर्यंत रात्रीच्या संचारबंदीत वाढ करण्यात आली. दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आदेश काढले आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी 18 ते 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी लागू केली होती. शनिवार सायंकाळी सहा ते सोमवार सकाळी नऊपर्यंत मिनी लॉकडाउन करण्यात आले होते. त्यानंतर सोमवार (ता.एक) ते आठ मार्चपर्यंत रात्रीच्या संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार बाजारपेठेची वेळ सायंकाळी पाचपर्यंत करण्यात आली आहे. शहरी, ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी तसेच जमावाने एकत्र येण्यावर बंदी आहे. धार्मिक स्वरूपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, मिरवणूक, रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे. हॉटेल, पानटपरी, चहाची टपरी, चौपाटी आदी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा, हॅण्ड सॅनिटायझर व सोशल डिस्टसिंगचे नियम पाळणे बंधनकारक राहील. जिल्ह्यातील शाळा इयत्ता पाचवी ते नववीपर्यंत सुरू असलेल्या फक्त नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारची खासगी शैक्षणिक संस्था, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील. या कालावधीत ऑनलाइन, दूरस्थ शिक्षण पद्धतीला परवानगी राहील. खासगी आस्थापना, दुकाने या ठिकाणी मास्क, फेसकव्हर घालून असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. रेस्टॉरंट, हॉटेलमधून पार्सल देता येणार आहे.
लग्नासाठी 25 व्यक्तींना परवानगी -
लग्न समारंभ खुले लॉन, मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 25 व्यक्तींच्या मर्यादेत संख्या ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. लग्न समारंभाकरिता तहसीलदार, मुख्याधिकारी व पोलिस विभाग यांना माहिती देणे बंधनकारक आहे.
शनिवार ते सोमवार 'मिनी लॉकडाउन' -
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या शहरी व ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता नियम लागू करण्यात आले आहे. त्यानुसार शनिवार सायंकाळी पाच ते सोमवार सकाळी नऊपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. या अंतर्गत दूध व दुग्धजन्य पदार्थ हे जीवनावश्यक असल्यामुळे तसेच ते नाशवंत पदार्थ असल्याने सातही दिवस सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजेपासून ते सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण मिनी लॉकडाउन घोषित करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व दवाखाने, औषधी दुकाने, पेट्रोलपंप, गॅस वितरण आदी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.