परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला, हलक्या धानाची झाली माती

साखरीटोला : ओले झालेले धानाचे कडपे दाखविताना शेतकरी.
साखरीटोला : ओले झालेले धानाचे कडपे दाखविताना शेतकरी.
Updated on

गोंदिया : गत चार-पाच दिवसांत कमी-अधिक प्रमाणात पडणाऱ्या परतीच्या पावसाने बुधवारी (ता.७) दुपारनंतर जिल्ह्याच्या बहुतांश भागांत मेघगर्जनेसह दमदार हजेरी लावली. या पावसाचा हलक्‍या धानाला फटका बसला असून, धानाचे कडपे ओलेचिंब झाले आहेत. दरम्यान, तोंडाजवळ आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

यंदाच्या खरीप हंगामात जवळपास एक लाख ९० हजार हेक्‍टर क्षेत्रात धानपिकाची लागवड करण्यात आली. यातही हलक्‍या जातीच्या धानाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला हुलकावणी देणाऱ्या पावसाने मध्यंतरी समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे मरणासन्न अवस्थेतील धानपिकाला नवजीवन मिळाले. शेतकरीदेखील पीक चांगले असल्याने आनंदात होते. मात्र, आठवडाभरापासून कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पाडले आहे. हलक्‍या धानाच्या कडपांवर पाणी गेल्याने कडपा काळ्याकुट्ट झाल्या आहेत. या कडपांना वाळविण्याचा आटोकाट प्रयत्न शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्या

अशातच आज, बुधवारी दुपारनंतर आणखी परतीच्या पावसाने गोंदिया शहर व तालुक्‍यातील रावणवाडी परिसर, तसेच सालेकसा तालुक्‍यातील साखरीटोला, अर्जुनी मोरगावसह तालुक्‍यात, सडक अर्जुनीसह तालुक्‍यातील पांढरी, कोसमतोंडीसह जिल्ह्याच्या बहुतांश भागांत मेघगर्जनेसह दमदार हजेरी लावली. त्यामुळे कापून ठेवलेल्या आणि मळणीच्या प्रतीक्षेत असलेल्या धानाचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. दरम्यान, प्रशासनाने धानपिकाचे सर्व्हेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.


हलक्‍या धानाचे प्रचंड नुकसान
यावर्षी उशिरा का होईना समाधानकारक पाऊस झाला. या हंगामात जवळपास सर्वच धान चांगल्या अवस्थेत होते. पण या आठवड्यात परतीच्या पावसाने संपूर्ण हलक्‍या धानाचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यासोबतच मध्यम व भारी धानावर तुडतुड्याने आक्रमण केल्याने उत्पादनात घट येण्याची शक्‍यता आहे. प्रशासनाने सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी.
- देवराम चुटे, सामाजिक कार्यकर्ते, साखरीटोला.


केशोरी परिसरात धानपिकावर तुडतुडा

अर्जुनी मोरगाव : तालुक्‍यातील केशोरी व परिसरातील धानपिकावर तुडतुडा या रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने ताबडतोब सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य रामलाल मुंगणकर यांनी केली आहे.
खरिपात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली आहे. मात्र, बहुतेक शेतकऱ्यांचे धानपीक तुडतुडा रोगाच्या प्रादुर्भावामुळे नष्ट झाले आहे. दरम्यान, तालुका प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मुंगणकर यांनी केली आहे.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.