संग्रामपूर : नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना, नागरिकांना शासनाकडून मदत दिली जाते. जिल्ह्यात गेल्या वर्षात आलेल्या अतिवृष्टीच्या नुकसानाची मदत अनेक अपात्र व्यक्तिंच्या खात्यात जमा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण आजवर गोपनिय पद्धतीने हाताळले जात होते. मात्र, वर्षभरानंतर प्रकरण अंगलट येते की काय म्हणून महसूल विभागाने संबंधित शेतकऱ्यांना वसुली च्या नोटीस दिल्यावर याचे बिंग फुटले.
निधी लाटणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांना शासनातर्फे नोटीस बजावत निधी तातडीने सरकार जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील या प्रकाराने जिल्हाभरात खळबळ उडवून दिली आहे.
सन २०२३ मध्ये जुलै महिन्यात जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीची, पिक नुकसानाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाकडून जमा करण्यात आली आहे. घरांचे नुकसान, जमिन खरडून गेलेल्यांना ही मदत करण्यात आली.
या नुकसानाचे पंचनामे योग्य पद्धतीने न झाल्याने अपात्र व्यक्तिंची नावे लाभार्थ्यांच्या यादीत टाकण्यात आल्याचा आरोप सातत्याने झाला होता. आता मदत निधी अपात्र व्यक्तिंच्या खात्यात जमा केल्याचे समोर आल्याने या आरोपांना बळ मिळाले आहे.
प्रशासकीय यंत्रणेतील कुठल्या घटकाने ही चुकिची माहिती शासनाकडे सादर करून अपात्र व्यक्तिंना मदत मिळवून दिली, याची चौकशी करण्याची गरज या निमित्ताने व्यक्त केल्या जात आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर महसूल, ग्रामीण व कृषी विभागाच्या संयुक्त पथकांनी पंचनामे केले होते. लाभार्थ्यांची अंतिम माहिती शासनाकडे पाठवताना अपात्र व्यक्तिंची नावे कुणी यादीत समाविष्ठ केली, याबाबत शोध घेण्याची गरज आहे.
नुकसान झालेले नसतानाही संबंधितांना हाताशी धरून यंत्रणेतील काही जणांनी ही मदत मिळवून दिल्याचे आता स्पष्ट दिसून येत आहे. ऐरवी शेतकऱ्यांना हजार-दोन हजारांची मदत मिळवायची असेल तर यंत्रणेचे उंबरठे झिजवावे लागतात.
असे असताना कुठलेही नुकसान न होता संबंधितांच्या खात्यात हजारोंची मदत कुठल्या आधारे वळती केल्या गेली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. महसूल यंत्रणेने हे प्रकरण गांभिर्याने घेतल्याचे सांगितले जात असून ज्या अपात्र व्यक्तिंच्या खात्यात निधी वळती झाला त्यांची खाती तातडीने बँकांना होल्ड करण्यास सांगण्यात आलेले आहे.
शिवाय संबंधित व्यक्तिंना शासनाचा निधी परत देण्याबाबत नोटीसही बजावण्यात आल्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, हा प्रकार उघडीस आला नसता तर शासनाचे कोट्यवधी रुपये अपात्र व्यक्तिंनी लाटले असते हे निश्चित. शिवाय त्यांना मदत करणारे झारितील शुक्राचार्यही मोकळे सुटले असते. याची महसूल यंत्रणेत खमंग चर्चा होत आहे.
जळगाव जा तालुक्यातील काही तलाठी व तहसिलमधील कर्मचाऱ्याने दलालांमार्फत शेती नसतानाही खोटी कागदपत्रे तयार करून अर्ज भरले. शेती खऱडून गेल्याच्या नुकसानीचा लाभ दिला आहे. हा प्रकार अंगलट येण्याची चिन्हे दिसत असल्याने आता शासनाने ७२ जणांना नोटीस दिली आहे.
जबाबदार अधिकारी, दलालांविरुद्ध कुठलीही कारवाई न करता तहसिलदारांनी अपात्र लाभार्थ्यांना पैसे जमा करण्याचे लेखी आदेश काढले आहेत, असा आरोप गावपातळीवरून केला जात आहे . शिवाय जळगाव तहसिल अंतर्गत अशा प्रकारचा तीन कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा जोरात आहे.
यासंदर्भात चौकशी केली असता संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बानोदा येथील पाच लोकांच्या खात्यावर असा निधी आला असून तो बँकेतून काढला पण गेला. ज्या लोकांच्या नावावर हा निधी आला ते या गावातील नसल्या चेही समजते .
तर संग्रामपूर तहसीलदार याच्या सांगण्यानुसार सदर लोकांनी पैसे शासनाकडे भरणा करण्याची तयारी दाखवली आहे. यावरून दोन्ही तालुक्यात शासनाच्या लोकांनीच सरकारी पैश्याची चोरी केली हे स्पष्ट होत आहे. हा प्रकार आणखी इतर ठिकाणी ही झाला असावा याची तपासणी झाली तर उघड झाल्याशिवाय राहणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.