अमरावती : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या विकास कामांना प्राधान्य देण्यासाठी बोलावलेल्या बैठकीला केवळ भाजपाच्या आमदारांना पाचारण करण्यात आले होते. अमरावतीच्या लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता घेतलेल्या बैठकीला काहीही अर्थ नाही, या बैठकीचा आम्ही तीव्र निषेध करतो, अशी भावना माजी मंत्री आणि आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात गुरुवारी संध्याकाळी अमरावती जिल्ह्याच्या विकासासंदर्भात विविध प्रकल्प आणि योजनांचा आढावा घेणारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि भाजपच्या आमदारांना पाचारण करण्यात आले होते. या बैठकीला अमरावती जिल्ह्यातील अन्य पक्षाच्या लोकप्रतिनिधींना बोलावण्यात आले नाही, असा ॲड. यशोमती ठाकूर यांचा आरोप आहे.
ॲड. ठाकूर म्हणाल्या, अमरावती जिल्ह्याच्या विकासासंदर्भात आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. अमरावती जिल्ह्यातील मोझरी, वलगाव, आणि कौंडण्यपूर विकास आराखड्याचा सातत्याने पाठपुरावा आम्ही करीत आहोत. जिल्ह्यातील विमानतळाचा तसेच एमआयडीसीतील विविध प्रश्न सातत्याने सरकारदरबारी मांडत आहोत. रखडलेल्या पाणीपुरवठा योजना सुरळीत व्हाव्यात तसेच जनतेला पाणी मिळावे,
मेळघाटातील माता मृत्यू आणि आरोग्याचे प्रश्न अतिशय गंभीर आहे त्यांची सोडवणूक व्हावी, यासाठी आम्ही सातत्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारला भेटून पाठपुरावा करीत असतो. मात्र असे असतानाही सरकारने केवळ एका पक्षाच्या आमदारांना बोलावून जो विकास कामांच्या आढाव्याचा फार्स केला आहे तो निषेधार्ह असून ही केवळ अमरावतीच्या जनतेची दिशाभूल आहे. केवळ श्रेयवादासाठी अशा पद्धतीच्या बैठका आयोजित करायच्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.