एटापल्ली (जि. गडचिरोली) : कोरोना आला आणि सर्वांना बेरोजगार करून गेला. घराबाहेर निघनेही कठीण झाल्याने नागरिकांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. हाताला काम नाही आणि घरात खायला नाही, अशी परिस्थिती गरिबांची झाली आहे. यामुळे गरीब, मजूर मिळेल ते काम करून घर चालवण्याच्या प्रयत्नात आहेत. असेच एक इसम काम नसल्याने तेंदूपाने संकलनासाठी गेले आणि भोवळ येऊन कोसळले. मात्र, त्याच्यासोबत पुढील घटनाक्रम घडला...
प्राप्त माहितीनुसार, लॉकडाउनमुळे कोणतेही काम मिळत नसल्याने गवंडी काम करणारे दुर्योधन कुंकलवार (वय 56) हे शुक्रवारी (ता. 22) तेंदूपाने संकलन करण्यासाठी गेले होते. त्यांनी सकाळी जंगलात जाऊन तेंदूपाने गोळा करून आणली. त्यानंतर कुटुंबाच्या मदतीने मुडके तयार करून विक्री करण्यासाठी दुपारी चार वाजताच्या सुमारास गावातील पानफळी संकलन केंद्रावर घेऊन गेले.
केंद्रावर पोहोचल्यानंतर काही वेळांनी त्यांना भोवळ आली व कोसळले. केंद्रावर जवळपास पंधरा ते वीस मजूर काम करीत होते. मात्र, एकाही मजुराचे त्यांच्याकडे लक्ष गेले नाही. यामुळे ते दोन तास तिथेच तडफडत राहिले. दोन तासांनी दुर्येधन यांच्याकडे स्वस्त धान्य दुकानदार प्रभाकर कुकटलावार यांचे लक्ष गेले. त्यांनी जाऊन बघितले असता दुर्योधन हे बेशुद्ध दिसले. त्यांनी तेंदूपाने कंत्राटदार व दुर्योधन यांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली.
यानंतर नोवाईक घटनास्थही पोहोचले. त्यांनी दुर्योधन यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली येथे दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे हलविण्यास सांगितले. त्यानुसार नातेवाईक त्यांना घेऊन निघाले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
कोरोनामुळे हाताला काम नाही. दुसरीकडे उन्ह चांगलीच तापत आहे. अशात दुर्योधन कुंकलवार हे तेंदूपाने संकलनासाठी जंगलात गेले. पान तोडून आल्यानंतर केंद्रावर विकण्यासाठी आणले. मात्र, अचानक ते भोवळ येऊन कोसळले. रुग्णालयात नेत असताना त्यांचा वाटेत मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला की आणखी कोणत्या आजाराने याचे नेमके कोणतेही कारण स्पष्ट झाले नाही. कुंकलवार यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या कुटुंबाला सरकारकडून आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.