डोक्यावर पदर, ना पाहुण्यांच्या बैठकीत जाण्याची मुभा; तरीही देशमुख घराण्यातील महिला सायकल दुरुस्ती करून बनली उद्योजिका

deepika deshmukh became entrepreneurs by repairing bicycles in telhara of akola
deepika deshmukh became entrepreneurs by repairing bicycles in telhara of akola
Updated on

तेल्हारा (जि. अकोला) : घरची परिस्थिती बेताची... पती अंथरुणाला खिळलेला... घरचे सायकलचे दुकान चालवायला गेलेल्या सासऱ्यांचा आणि मुलांचा झाला अपघात; मात्र, हिंमत न हारता देशमुख घराण्याची पारंपरिक बंधने झुगारून ती सायकल दुरूस्तीच्या माध्यमातून कुटुंबाच्या उदहनिर्वाहासाठी उभी ठाकली. सुरुवातीला नातेईवाईक व ओळखीच्या लोकांनी नावे ठेवली. पण, त्याकडे लक्ष न देता सुरुवातीला सायकलचे दुकान चालविले अन् आज त्या गृहउद्योजिका बनल्या आहेत. ही प्रेरणादायी कहाणी आहे अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील दीपिका देशमुख यांची...

सासऱ्यांचा अपघात झाला अन् ...
दीपिका यांचा विवाह २००२ मध्ये तेल्हारा येथील प्रकाश देशमुख यांच्यासोबत झाला. संसार सुखाने सुरू  होता. त्यांना सार्थक आणि दिशा नावाची दोन अपत्यही झाली. त्यानंतर मात्र त्यांच्या पतीला आजाराने ग्रासले. पती  सायकल दुरुस्ती आणि विक्रीचा व्यवसाय करत होते. मात्र, आजारी असल्यामुळे हे दुकान कोण सांभाळणार? असा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर दीपिका यांचे सासरे दुकान सांभाळू लागले. मात्र, दुर्दैवाने त्यांचाही अपघात झाला. परत कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. दुकान बंद ठेवले तर पोटाची भूक भागणार कशी? ही चिंता त्यांना सतावत होती. त्यानंतर दीपिका यांनी दुकान चालविण्याचा निर्णय घेतला. मात्र, देशमुख घराण्यातील महिला पाहुण्यांच्या बैठकीतही बाहेर निघत नाही. डोक्यावरचा पदरही खाली पडत नाही, तर एक बाई दुकान कशी सांभाळणार? असे एक ना अनेक प्रश्न शेजारी, कुटुंबातील सदस्य विचारू लागले. कुटुंबीयांचा प्रचंड विरोध झाला. मात्र, आजारी पतीवर उपचार करण्यासाठी पैसा लागणार होता. त्यामुळे दीपिका गावातील नागरिकांच्या टीकेला भीक न घालता दुकाने चालवू लागल्या. तेही डोक्यावरचा पदर खाली पडू न देता.

मुलाचा अपघात -
कुटुंबीयांनी काही वाईट बोलायला नको म्हणून त्या मुलाला सोबत घेऊन दुकानात जात होत्या. त्यावेळी मुलगा फक्त पाचवीत होता. मात्र, त्याच काळात मुलाचाही अपघात झाला आणि दीपिका यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर कुटुंबीयांनी दुकान बंद करण्याचा सल्ला दिला. पण, आजारी पती, अपघातग्रस्त सासरे आणि मुलगा यांच्या उपचारासाठी येणारा खर्च भागणार कसा? ही चिंता दीपिका यांना होती. त्यांनी अतिशय खंबीरपणे परिस्थिती हाताळली आणि दुकानात काम करणे सुरुच ठेवले. 

कामासोबतच शिक्षणही -
दीपिका यांच्या हाताखाली दोन कामगार होते. मात्र, त्यांनी स्वतः सायकलचे स्पेअर पार्ट तयार करणे. पंक्चर काढणे, सायकल दुरुस्ती करणे, ही सर्व कामे शिकून घेतली. त्यानंतर त्या स्वतः हे काम करत होत्या. त्यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले होते. त्यामुळे ग्राहकांकडून त्यांची फसवणूकही व्हायची. त्यासाठी त्यांनी मुलीकडून शिक्षण घेतले. दुकानात बसून फावल्या वेळेत त्यांनी एबीसीडी असेल इंग्रजीमधील पाढे असतील सर्व काही शिकल्या. त्यामधून पुढे शिक्षण घेण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी यशस्वीपणे बारावी पूर्ण केली. आता बीएला अ‌ॅडमिशन घेतलीय. 

व्यवसाय करण्याचा आत्मविश्वास -
दुकानातील कामातून मिळालेल्या वेळेत त्यांनी पापड लाटायला सुरुवात केली. सायकल दुरुस्तीसाठी येणाऱ्या ग्राहकांना त्या पापडही विकू लागल्या. त्यानंतर त्यांनी युट्यूबवर व्हिडिओ पाहून ज्वेलरी बनवायला सुरुवात केली. एका ग्राहकाला दागिने फार आवडले. ग्राहकाने दागिन्यांची मागणी केल्यानंतर आपण हा व्यवसाय करू शकतो, याचा आत्मविश्वास निर्माण झाला. 

अशी झाली संस्थेची निर्मिती -
दीपिका यांनी परिसरातील महिलांची मागणी लक्षात घेऊन डोहाळे जेवण, संक्रांतीला लागणारे दागिने बनवायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी सूर्योदय गृहद्योगाची स्थापना केली. त्यामाध्यमातून तेल्हारा तालुक्यातील महिला त्यांच्यासोबत जुळल्या. ज्यांना जे काम चांगले येते ते करण्याची मुभा महिलांना देण्यात आली. त्यानंतर कोणी कुरड्या, शेवया, पापड्या, इंस्टंट ढोकळा, इडली, डोसा पीठ, हलव्याचे दागिने, रेशिमच्या धाग्यापासून ज्वेलरी सर्वकाही बनविण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता त्यांच्या उत्पादनांची मागणी वाढली. विशेष म्हणजे ज्या महिलांचे पती व्यसनाधीन आहेत, अशाच महिलांना दीपिका यांनी रोजगार दिला. त्यामुळे तालुक्यातील हजारो महिला आर्थिक सक्षम झाल्या. आता त्यांना त्यांच्या पतीची आणि कुटुंबातील इतर सदस्यांचीही साथ मिळाली आहे.

कोरोना काळात शोधली संधी -
कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि सुरू असलेला व्यवसाय ठप्प झाला. मात्र, याकाळातही दीपिका यांनी व्यवसायाची संधी शोधली. कोरोना काळात मास्क वापरणे अनिवार्य आहे, हे समल्यानंतर दीपिका यांनी एका व्हॉट्सअ‌ॅप ग्रुपमध्ये मास्कसंबंधी मेसेज टाकला. तो मेसेज व्हायरल झाल्यानंतर त्यांना मास्कची ऑर्डर आली. चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी मास्क बनवायला सुरुवात केली. त्यामाध्यमातून त्यांनी लॉकडाऊनच्या काळातही अनेक महिलांना रोजगार दिला. पंचायत समिती, जिल्हा परिषद, रुग्णालय, अशा सर्व ठिकाणी त्यांनी मास्क पुरवले. यामधून एका महिलेला १५ हजार रुपये महिना त्यांनी दिला. लॉकडाऊनच्या काळात जवळपास १ लाख मास्क विकल्या गेले. मात्र, याच काळात त्यांना गावातील लोकांनी कोरोना रुग्णासारखी वागणूक दिली. तुझ्यामुळे आमच्या गावात कोरोनाचा शिरकाव होईल. त्यामुळे गावातून बाहेर पडू नकोस, असे अनेकांनी सांगितले. तरीही दीपिका यांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला. 

लॉकडाऊनमध्येच त्यांनी दहा हजार पाणीपुरीची विक्री केली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून त्यांनी ही पाणीपुरी बनविली. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. त्यामाध्यमातूनही त्यांनी अनेक महिलांना रोजगार दिला. 

एका मूर्तीच्या व्हायरल फोटोने व्यवसायाची नवी संधी -

मूर्ती बनविण्याची आवड होतीच. लॉकडाऊन काळात छंद जोपासा, अशी एक स्पर्धा होती. त्यासाठी दीपिका यांनी तुळजाभवानीची मूर्ती बनविली. त्यानंतर त्या मूर्तीचा फोटो व्हायरल झाला. तसेच सकाळ माध्यम समूहाने देखील त्याची दखल घेतली. त्यानंतर त्यांना गणेश मूर्ती बनविण्याची ऑर्डर मिळाली. त्यांनी सूर्योदय संस्थेच्या माध्यमातून माती, तुळशीच्या बिया टाकून ५०० गणेशमूर्ती तयार केल्या. त्या देखील कमी पडल्या. पुढील वर्षीसाठी त्यांनी १० हजार मूर्तींची ऑर्डर मिळाल्याचे दीपिका यांनी सांगितले. 

दीपिका यांना मिळालेले पुरस्कार -

  • सायकल दुरुस्त करणारी महिला ते सूर्योदय गृहद्योगाची संचालिका, अशी ओळख मिळालेल्या दीपिका देशमुख यांची अनेक संस्थांनी दखल घेतली. त्यांचा गौरवही केला.
  • नाशिक येथील कर्मयोगी बहुद्देशीय संस्था आणि तनिष्का डॉक्टर्स फोरमच्यावतीने कर्मयोगी महिला रत्न पुरस्काराने सन्मानित
  • अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख समाजसेवी संस्था आणि स्वामिनी महिला युनिटीच्यावतीने यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

सकाळ माध्यम समूहाच्या 'तनिष्का' व्यासपीठाचे पाठबळ -
एक महिला सायकल दुरुस्तीचे दुकाने चालवित असल्याची माहिती मिळाल्यानंतर 'तनिष्का' व्यासपिठाच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर दीपिका तनिष्काच्या सदस्य झाल्या. त्यामधून त्यांना नवनवीन रोजगार करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या. आज घरात घाबरत जगणाऱ्या दीपिका चारचौघांमध्ये अगदी आत्मविश्वासाने बोलतात. त्यामुळे त्यांनी सकाळ माध्यम समूहाचेही आभार मानले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.