32 विद्यार्थ्यांवर हृदयरोग शस्त्रक्रिया; 36 हजार 664 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
हिंगणा - राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत शालेय आरोग्य तपासणी तालुक्यातील 209 शाळांमध्ये करण्यात आली. 36 हजार 664 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून 322 विद्यार्थ्यांना आजार आढळल्याने उपचारासाठी "डीईआयसी' केंद्रात पाठविण्यात आले. यातील 32 हृदयरोग असलेल्या विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे नागपूर डागा रुग्णालयातील डीईआयसी केंद्र ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरले आहे.
हिंगणा तालुक्यात जि. प. व खासगी शाळांची संख्या 209 असून विद्यार्थी पटसंख्या 40 हजार 384 आहे. आरोग्य तपासणी 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची करण्यात येते. शाळेमध्ये जुलै ते डिसेंबर तर अंगणवाड्यांमध्ये पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर ते मार्च व दुसऱ्या टप्प्यात एप्रिल ते जून या कालावधीत तपासणी केली जाते. आतापर्यंत 35 हजार 644 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यात सर्दी, ताप, खोकला आदी किरकोळ आजारांचे 2731 रुग्ण आढळले. विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या 322 विद्यार्थ्यांना डीईआयसी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर येथे पाठविण्यात आले. 2013 ते जानेवारी 2017 पर्यंत 56 हृदयरोग असलेले विद्यार्थी आढळले. यातील 32 विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पालकवर्गाच्या नकारांमुळे 7 विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया अद्याप झाल्या नाहीत.
2016-17 या कालावधीत 14 इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यात तिरळेपणा, जन्मजात मोतीबिंदू, अपेंडीस, हायड्रोसील आदी आजारांचा समावेश आहे. जिल्हा शल्य चिकित्सकाअंतर्गत ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकांत घोडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणा तालुक्यात तीन डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे. यात पाच डॉक्टर, औषध निर्माता व एका परिचारिकेचा समावेश आहे. डॉ. क्षमा नागपुरे, डॉ. रोशन शेंडे, डॉ. विजय वानखेडे, डॉ. पूनम फुलाडी, डॉ. दीपा कावनपुरे आदी वैद्यकीय अधिकारी शालेय आरोग्य तपासणी मोहीम यशस्वीरीत्या राबवीत आहेत.
असे होतात उपचार
"डीईआयसी' (जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र) मागील वर्षांपासून नागपूर डागा रुग्णालयात प्रारंभ करण्यात आले. येथे शालेय आरोग्य तपासणीतील आजारी विद्यार्थ्यांवर उपचार करण्यासाठी बालरोग, दंतरोग, भौतिकोपचार, ऑडिओलॉजिस्ट व स्पीच थेरेपिस्ट तज्ज्ञ कार्यरत आहेत. या तज्ज्ञांद्वारे वेळोवेळी तत्परतेने उपचार केले जात आहेत. हृदयरोग रुग्णांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाठविले जाते. सर्व शस्त्रक्रिया व औषध उपचार निःशुल्क केले जातात. यामुळे ग्रामीण भागातील गरीब जनतेला याचा लाभ होत आहे. शालेय तपासणीतील आकडेवारी पाहता डीईआयसी सेंटर रुग्णांना दिलासा देणारे ठरले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उमेश नावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डागा रुग्णालयात "डीईआयसी' सुरू झाल्यापासून शालेय तपासणीतील आजारी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार केले जात आहेत. 18 वयोगटातील विद्यार्थ्यांवर उपचार करणारी तज्ज्ञ डॉक्टर मंडळी कार्यरत आहे. निःशुल्क शस्त्रक्रिया व उपचार होत असल्याने सेवेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा.
- डॉ. विवेक येवले, व्यवस्थापक जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र, नागपूर
|