साकोली (जि. भंडारा) : खरीप हंगामात भरघोस उत्पादन झाल्याने आधारभूत हमीभाव केंद्रांवर धानाची विक्रमी खरेदी करण्यात आली. दरम्यान, मिलींग करण्यासाठी खरेदीकेंद्रांच्या गोदामातील धानाची उचल करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत जुन्याच धानाने गोदामे तुडुंब भरून आहेत. एकट्या साकोलीत श्रीराम सहकारी भात गिरणी केंद्रावर 40 हजार टन धानसाठा पडून आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या उन्हाळी धानखरेदीस दिरंगाई होत आहे. यामुळे संतप्त होऊन शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रावर धडक देऊन रोष व्यक्त केला.
खरीप हंगामात उत्पादनात झालेली वाढ, आधारभूत केंद्रावर बाजारभावाच्या तुलनेत मिळणारा योग्य भाव, चुकारे तातडीने जमा होण्याची सुविधा तसेच धानावर मिळणारा बोनस या जमेच्या बाजू असल्याने मार्केटिंग फेडरेशनद्वारा नियुक्त केंद्रांवर एप्रिल महिन्यापर्यंत धानाची खरेदी करण्यात आली. गोदामात साठविलेले धान राईसमिलर्सकडून उचल करून तयार तांदूळ जिल्हा पुरवठा विभागाला दिला जातो.
संतप्त शेतकऱ्यांची केंद्रावर धडक
यावेळी प्रचंड उत्पादन झाल्याने विक्री-खरेदी-उचल हे चक्र खोळंबले आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने संचारबंदी व लॉकडाउनची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी पुन्हा त्यात खोडा निर्माण झाला.
आजघडीला जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात असलेल्या खरेदी केंद्रावर धानाची गोदामे हाउसफुल्ल झाली आहेत. गोदामांची संख्या आधीच कमी त्यात धानाची उचलच होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाउनपासून धानाचे चुकारे तसेच सानुग्रह अनुदानाची रक्कमसुद्धा अद्याप शेतकऱ्यांच्या बॅंकखात्यात जमा झालेली नाही.
साकोली तालुक्यातील विर्शी, एकोडी, बोदरा व साकोलीसह इतर केंद्रांवर खरिपातील शेतकऱ्यांचे हजारो क्विंटल धान उघड्यावर पडून आहेत. त्यातच रब्बी(उन्हाळी) धान विक्रीसाठी तयार आहे. परंतु, उन्हाळी धानखरेदी केंद्रे सुरू झाली नाहीत. अवकाळी व वादळी पाऊस दररोज हजेरी लावत आहे.
त्यामुळे उन्हाळी धान पावसात भिजून सडण्याची अंकुर फुटण्याची शक्यता निर्माण झाली. साकोली शहरात सर्वांत मोठे केंद्र असलेल्या श्रीराम सहकारी भात गिरणी केंद्रावर खरिपातील 40 हजार टन धान गोदामात पडून आहेत. दुसरीकडे उन्हाळी धानखरेदी सुरू न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
उन्हाळी धानखरेदी केंद्रे सुरू करावी, या मागणीसाठी राधेश्याम मुंगमोडे, नरेंद्र वाडीभस्मे, दीपक हिवरे, निशांत कुडेगावे व अनिकेत चिरवतकर यांनी केंद्रावर धडक देऊन आपल्या समस्या मांडल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.