नागपूर : आयुष्यात कधी काय होईल याचा नेम नसतो. एखाद्याला आयुष्यभर कायम संघर्ष करावा लागतो आणि जेव्हा समाधानाचे दिवस येतात तेव्हा ती व्यक्ती काही कळायच्या आत आपल्यातून निघून जाते. त्या व्यक्तीचे जाणे आपल्या मनाला चटका लावून जाते. अशीच मनाला चटका लावून जाणारी घटना सुधाकर बारसाय वाचामी यांच्याबाबतीत घडली. विपरित परिस्थितीत शिक्षण घेऊन आदिवासी माडिया समाजातील पहिला डेन्स्टिस्ट डॉक्टर बनण्याचा मान सुधाकरने मिळविला. दुर्गम भागातील आदिवासी समाजातील आरोग्याच्या समस्या सोडवायच्या असा निर्धार त्यांनी केला होता. परंतु, त्यांची स्वप्ने मातीमोल झाली. कारण, गावी आला असता त्यांना विषारी सापाने दंश केला आणि सारेच संपले.
भामरागड तालुक्यातील कियर अतिदुर्गम गाव. या गावात राहणारे आदिवासी बांधव माडिया समाजातील आहेत. काही जण ओतनकार आहेत. पितळ-लोखंड यापासून कलाकुसरीच्या वस्तू बनविण्यात या गावातील काही जण तज्ज्ञ आहेत. बांबू आणि लाकडापासून काही जण विविध प्रकारच्या वस्तू बनवतात. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या बांबूच्या टोपल्या, तांदूळ साठवायला लागणारे बांबूचे मोठे डाल तसेच बांबूंच्या पट्ट्यांपासून बनविलेल्या चट्या हे नियमित सर्व आदिवासी बांधव करीत असतात.
याच गावातील सुधाकर बारसाय वाचामी हा अतिशय हुशार आणि मेहनती मुलगा हेमलकसा येथील लोक बिरादरी आश्रमशाळेतून १९९२ साली ९१ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. शाळेत शिकत असताना तो त्याच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या मुलांना नेहमी मदत करीत असे. पुढे बारावीत त्याला चांगले गुण प्राप्त झाले. त्यानंतर नागपूरच्या शासकीय डेंटल महाविद्यालयात त्याने दातांचा डॉक्टर (BDS) म्हणून पदवी मिळवली. आदिवासी समाजातील पहिला डेंटिस्ट म्हणून त्याला मान मिळाला.
कामानिमित्त जेव्हा डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे तसेच लोकबिरादरी आश्रमशाळेचे तेव्हाचे मुख्याध्यापक गोपाळ फडणीस नागपूरला जात असत, तेव्हा सुधाकरच्या हॉस्टेलला जाऊन त्याची आवर्जून विचारपूस करीत असत आणि त्याचा उत्साह वाढवीत असत. डॉक्टर झाल्यावर त्याने गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे काही दिवस नोकरी केली. त्याचदरम्यान त्याचे रमिला या हेमलकसा गावातील मुलीशी लग्न झाले.
साधारण १२-१३ वर्षांपूर्वी सुधाकर गावी आला असताना त्याला रात्री झोपेत भयंकर विषारी मण्यार सापाने दंश केला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी त्याची पत्नी गर्भार होती. त्याच्या परिवारावर आणि लोक बिरादरी परिवारावर शोककळा पसरली. रमिला लोक बिरादरी दवाखान्यात तेव्हापासून डॉ. दिगंत आणि डॉ. अनघा आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ती म्हणून काम करीत आहे.
कियर गावाचा दिलीप नारू पुंगाटीचा जन्म १९८५ चा. त्याला दोन भाऊ. एक पोलिस शिपाई तर दुसरा आई-बाबांबरोबर गावात शेती करतो. दिलीपचे पहिले ते दहावीचे शिक्षण लोकबिरादरी आश्रमशाळेत झाले. २००१ ला तो दहावी बोर्डाच्या परीक्षेत भामरागड तालुक्यातून पहिला आला होता. पुणे येथील MIT इंजिनिरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिरिंगला ॲडमिशन मिळाली. पुण्यात शिकत असलेल्या ८-१० आदिवासी विद्यार्थ्यांनी एक खोली भाड्याने घेतली होती. त्यात दाटीवाटीने राहायला सुरुवात केली.
सविस्तर वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार
भाड्याच्या रूमपासून कॉलेज लांब असल्याने सकाळी ८ वाजता जेवून निघावे लागे. लंच टाईम व्हायचा पण पैसे नसल्याने उपाशीच राहावे लागत असे. इंजिनीरिंगचे शिक्षण सुरू असताना हृदयाची एक झडप निकामी असल्याचे निदान झाले. त्यावेळी डॉ. प्रकाश आमटे यांनी सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे संवाद साधला. समवेदना या NGO मार्फत प्रीती दामले मॅडमनी ओपन हार्ट सर्जरीचा संपूर्ण खर्च केला. दिलीपला नवजीवन प्राप्त झाले. अशा खडतर परिस्थितीशी सामना करीत त्याने इंजिनीरिंग पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला.
२०१७ मध्ये तलाठीच्या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. तेव्हापासून सिरोंचा येथे तो तलाठी म्हणून कार्यरत आहे. याच वर्षी उन्हाळ्यात सोनी या M.Sc. (Agri) असलेल्या मुलीशी त्याचे लग्न झाले. सोनी सिरोंचा तालुक्यातील सिरकोंडा गावाची आहे. ती सध्या तालुका कृषी कार्यालय सिरोंचा येथे कृषिसेवक म्हणून कार्यरत आहे. यांचा प्रवास सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे.
लेखक - अनिकेत आमटे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.