सुरजागड पहाडावर उत्खनन सुरूच; नक्षलवाद्यांच्या धमक्यांना घातली नाही भीक

एटापल्ली येथील सुरजागड पहाड
एटापल्ली येथील सुरजागड पहाड
Updated on

गडचिरोली : जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरच्या लोहखनिजाचे उत्खनन केल्यास प्राणास मुकावे लागेल, अशा आशयाचे धमकीची पत्रके नक्षलवाद्यांनी या परिसरात टाकल्यानंतरही येथे उत्खननाचे काम करणाऱ्या कंपनीने अजिबात माघार घेतली नाही. उलट येथे काम करण्यासाठी विविध पदांची भरती सुरू केली आहे. त्यामुळे लोहखनिजाचा हा लोभ अनेकांच्या जिवावर उठण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (Excavations-continue-on-Surjagad-hill-ignoring-the-threat-of-Naxals)

राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीवर अनेक खासगी व्यावसायिकांचा डोळा आहे. विशेषत: येथे असलेली खनिज संपत्ती अनेकांचे डोळे पांढरे करणारी आहे. ज्याप्रमाणे इंग्रज भारतात कापूस पिकवून तो कापूस आपल्या देशात नेऊन त्याची वस्त्रे पुन्हा भारतात विकून अमाप पैसा मिळवायचे अगदी तशीच नीती सध्या गडचिरोली जिल्ह्याबाबतही वापरण्यात येत असल्याचे दिसत आहे.

एटापल्ली येथील सुरजागड पहाड
वाघाचा थरार! एकाला मानेला पकडून नेले ओढत, तर दुसऱ्याला झाडावरून खेचले खाली

येथे मोठा प्रकल्प होईल, अनेकांच्या हाताला काम मिळेल असे सांगून इथल्याच स्थानिक आदिवासींना आपल्याच पूर्वजांनी प्राणपणाने जपलेले जंगल तोडायला लावण्यात येत आहे. येथे उत्खनन केलेल्या लोहखनिजावर प्रक्रिया करणारा उद्योग जिल्ह्यातच उभारण्याऐवजी परजिल्ह्यात हा कच्चा माल सर्रास पाठविला जात आहे.

सुरजागड प्रकल्प जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वादाचाच विषय राहिला आहे. याच विषयाला धरून अनेक राजकारण्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. निवडणुकांचे वारे वाहू लागले की हा प्रकल्प पूर्ण करू, येथील लोहखनिजावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारू, अशी आश्वासने जनतेला देण्यात येतात. पण, नंतर यातील काहीच न होता केवळ इथला लोहखनिज इतर जिल्ह्यात परस्पर पाठविला जातो. हेच आजपर्यंतचे चित्र आहे.

मात्र, या प्रकल्पाला येथील ग्रामसभांचा व नक्षलवाद्यांचाही सुरुवातीपासून विरोध राहिला आहे. आधी हे काम लॉयड मेटल्स कंपनीकडे असतानाही नक्षलवाद्यांनी आक्रमक भूमिका घेत येथे कामावर असलेली ८३ वाहने जाळू टाकली होती. त्यानंतर अहेरीत झालेल्या अपघातामुळे हे उत्खनन बंद होते. आता हे काम पोटकंत्राट म्हणून त्रिवेणी अर्थमुव्हर्स लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने येथे धडाक्यात आपले काम सुरू केले आहे.

एटापल्ली येथील सुरजागड पहाड
Awareness : पर्यावरणाच्या रक्षणासाठी सुरभीने राबविले जनजागृती अभियान

मध्यंतरीच्या काळात पोलिसांच्या शौर्यपूर्ण कामगिरीमुळे नक्षलवादी बऱ्यापैकी कमजोर झाले आहेत. त्यामुळे आता ते काही नुकसान करणार नाहीत, असा अंदाज लावत हे काम पुढे रेटण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी नुकतीच येथे पत्रके टाकून स्थानिकांना काम बंद करण्याची अन्यथा मृत्यूला तयार होण्याची धमकी दिली होती. पण, नक्षलवाद्यांच्या या धमकीचा काहीही परिणाम झाला नाही. उलट अधिक जोमात काम सुरू झाले आहे.

या कंपनीने उत्खननासाठी मायनिग फोरमन, मायनिग मेट, एस्कॅव्हेटर ऑपरेटर्स, लोडर ऑपरेटर, वॉल्वो ऑपरेटर, डोझर ऑपरेटर, ग्रेडर ऑपरेटर, ड्रिलर्स, सेफ्टी ऑपरेटर्स, मेकॅनिकल इंजिनिअर, मेकॅनिकल फोरमन, सिनो मेकॅनिक्स, ऑटो इलेक्ट्रिशन, इक्वीपमेंट एसी टेक्निशियन आदी विविध पदांसाठी भरती सुरू केली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या पोकळ धमक्यांना आपण मुळीच भीक घालत नाही, हाच संदेश या कंपनीने नक्षलवाद्यांना दिला आहे.

एकेकाळी एटापल्ली, भामरागड तालुक्यात असलेली नक्षलवाद्यांची दहशत बरीच ओसरली आहे. याचे श्रेय पोलिस विभागालाच जाते. त्यामुळे आता या परिसरात इतरही अनेक खासगी कंपन्या बिनधास्त काम करू शकतील, असे चित्र निर्माण झाले आहे. पण, नक्षलवादी चूप बसतीलच असे नाही. त्यांच्याकडून काही हिसक कारवाया झाल्यास नुकसान येथील स्थानिक मजुरांचेच अधिक होणार आहे. त्यामुळे आता यासंदर्भात कंपनीतील मजूर, स्थानिक नागरिक, ग्रामसभा, विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्ष काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एटापल्ली येथील सुरजागड पहाड
चार युवकांनी सुरू केला कचऱ्यापासून फर्निचर तयार करण्याचा प्रकल्प

हे तर खुले आव्हान

पूर्वी नक्षलवाद्यांचे एक पत्रक मिळाले तरी तेंदूपत्ता कंत्राटदार, जंगलात रपटे, पूल बांधणारे, रस्ता काम करणारे कंत्राटदार व उत्खनन करणाऱ्या कंपन्यांचीही बोबडी वळायची. पण, आता नक्षलवाद्यांची ताकद बरीच कमी झाल्यामुळे ते फार काही करू शकणार नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळेच या कंपनीने नक्षलवाद्यांना अजिबात न घाबरता उलट पुन्हा पदभरती घेत एकप्रकारे त्यांना खुले आव्हानच दिले आहे. त्यामुळे आता नक्षलवादी कोणती प्रतिक्रिया देतील, याबद्दलही परिसरात चर्चेला उधाण आले आहे. शिवाय येथे नक्षलवाद्यांनी कोणतेही उपद्व्याप करू नये, यासाठी पोलिस विभागही सतर्क झाला आहे.

(Excavations-continue-on-Surjagad-hill-ignoring-the-threat-of-Naxals)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.