वरुड (अमरावती) : जिल्ह्यातील वर्धा नदीवर (wardha river incident) असलेल्या झुंज धबधब्याजवळ ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामधील तिघांचे मृतदेह मिळाले. अद्याप ८ जणांचे मृतदेह बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. मात्र, याच बोटीवर असलेल्या दोघांनी पोहत नदी पार केली आणि आपला जीव वाचविला. ही घटना नेमकी कशी घडली? याचा थरारक अनुभव श्याम मटरे यांनी सांगितला.
श्याम यांच्या भावाचे निधन झाले होते. त्यामुळे सर्व कुटुंबीय दुःखात होते. त्यांच्या दशक्रियेचा विधी आणि एकाचवेळी कुटुंबातील सदस्यांचे वर्धी नदीपात्रात बेपत्ता होण्याच्या घटनेने श्याम पूर्णपणे हादरून गेले आहेत. मोठ्या भावाचा मृत्यू झाल्याने सर्वजण राख शिरविण्यासाठी नावेत बसून जात होते. काही अंतरावर राख शिरविली. त्यानंतर परतीच्या प्रवासाला निघालो. मात्र, अचानक नदीचा प्रवाह वाढला आणि नाव अनियंत्रित होऊन उलटली. मी जावयाचा हात पकडला आणि त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हाथ सुटला अन् तेही वाहत गेले. नारायण मटरे यांनी पाण्यात बुडत असलेल्या दोन वर्षीय चिमुकलीला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचा दम पुरला नाही आणि मुलीसह तेही पाण्यात बुडाले. काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. कोणाचाही थांगपत्ता लागत नव्हता. डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत होते, काही क्षणात सारेच दिसेनासे झाले, असा मृत्यूचा थरार श्यामने सांगितला. यावेळी तो पूर्णपणे भेदरलेला होता आणि तो ढसाढसा रडत होता.
डोळ्यासमोर कुटुंबातील ११ जणांना मरताना पाहिल्याने श्याम पूर्णपणे हादरून गेले आहेत. प्रत्येक क्षण त्याच्या नजरेसमोर दिसतो आणि त्यांचा जीव कासाविस होते. त्यांचे जावई, बहीण आणि कुटुंबातील इतर सद्स्य अचानक बुडाल्याने ते आजही वर्धी नदीपात्रावर आपल्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.
अद्याप ८ जण बेपत्ताच -
वरुड तालुक्यातील व बेनोडा शहीद पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या झुंज धबधबा येथे मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास तब्बल अकरा जण बुडाल्याची घटना घडली. या घटनेच्या वेळी १३ जण नावेत होते. दोघे पोहत बाहेर आले तर तिघांचे मृतदेह कालच सापडले होते. मात्र अन्य आठ जण अद्यापही बेपत्ता आहेत. प्रशासनामार्फत कालपासूनच युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. अमरावतीवरून जिल्हा शोध व बचाव पथकाचे वीस सदस्य घटनास्थळी दाखल असून मदतकार्य सुरू आहे. नागपूर येथून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दलाची पथके, राज्य राखीव पोलिस दल तसेच स्थानिक पोलिस बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेत आहेत. बुधवारी (ता.१५) दुपारपर्यंत एकाही व्यक्तीचा मृतदेह या पथकाला सापडलेला नाही. नदीतील पाण्याच्या प्रवाहाला वेग असल्याने बुडालेले लोक वाहून पुढे गेले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.