शेतकऱ्यांनी करून दाखविले, पुलासाठी जमविला तब्बल एवढा निधी

Farmers raised money and built bridges
Farmers raised money and built bridges
Updated on

गिरड (जि. वर्धा) : एकीच्या बळाने मोठ्यात मोठ्या संकटातून मार्ग काढता येतो. हे सत्य असल्याचे समुद्रपूर तालुक्‍यातील उमरी (कोरा) येथील शेतकऱ्यांनी दाखवून दिले. शेतात जाण्याच्या मार्गात आडव्या असलेल्या नाल्यावर पूल बांधण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी शासनाच्या पायऱ्या झिजवल्या. पण, कुणीच मनावर घेतले नाही. अखेर येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत वर्गणी गोळा करून या नाल्यावर पूल उभा करून गावातील एकीचे दर्शन घडवून दिले.

उमरी (कोरा) येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या मार्गावर खाल नाला होता. या नाल्यात असलेल्या पाण्यातून जीव मुठीत घेत मार्ग काढावा लागत होता. ही अडचण लक्षात घेत गावकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसह शासनाला आर्जव केले. अनेकदा निवेदन देत पुलाची मागणी केली. परंतु, शासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. शेतात बैलबंडीसह इतर साहित्य नेण्यासाठी त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे रस्त्यावर पुलाची गरज असल्याने शेतकऱ्यांनी एकत्र येत आपली अडचण जाणून त्यांनी वर्गणीतून पूल बांधण्याचा निर्णय घेतला.

उमरी-साखरा पांदण रस्त्यावर उमरी गावालगत दररोज शेतकऱ्यांना गेल्या कित्येक वर्षांपासून धोकादायक नाला पार करावा लागत होता. दरवर्षी पावसाच्या दिवसांत नाल्यावर मुरुम व गोटे टाकून तात्पुरता रस्ता तयार करून बैलगाडी शेतात नेण्याचा प्रकार सुरू होता. मात्र, नाल्याला पूर येताच टाकलेला मुरुम गोटे वाहून जाणे नित्याचेच होते. यामुळे दरवर्षी या मार्गावरील शेतकऱ्यांसमोर शेतात जाण्याचा मोठा प्रश्‍न निर्माण होत होता. यामुळे येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत ऐकीच्या बळातून श्रमदानातून व लोकवर्गणीतून नाल्यावर पुलाची निर्मिती केली.

वर्गणीतून दीड लाख रुपये गोळा करून वाळू, सिमेंट, गिट्टी आणली. गावातील मिस्त्री सूर्यवंशी यांची मदत घेऊन नरेंद्र पोफळे, वारलू मिलमिले, शंकर इसनकर, रूमदेव ठेंगणे, भैया काकडे, केशव मोहितकर, दुर्योधन काकडे, बाबा नागपुरे, अरुण काकडे, रमेश घुघल, सूर्यभान भोयर, कवडू पिंपळकर, निशांत, अमर आदींनी 30 फूट लांब व 14 फूट रुंद पक्का पूल तयार केला.

लोकप्रतिनिधींचा विकासनिधी कशासाठी

जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या अडचणी दूर करण्याकरिता शासनाकडून आमदार, खासदार यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. लोकप्रतिनिधींकडे असा निधी असताना शेतकऱ्यांना वर्गणी काढून पूल बांधावा लागला. यामुळे लोकप्रतिनिधींच्या या निधीचा शेतकऱ्यांना लाभ होत नसेल तर त्याचा लाभ काय, असा प्रश्‍न अनेकांकडून उपस्थित करण्यात आला.

मोठ्या नाल्यामुळे अडचण

शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता असलेल्या मार्गावर असलेल्या मोठ्या नाल्यामुळे अडचण निर्माण झाली. यासंदर्भात अनेकदा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. परंतु, कुणीच काही केले नाही. यामुळे आम्ही वर्गणी करून पुलाचे बांधकाम केले.
भैया काकडे, शेतकरी

पुलाचे काम लोकवर्गणीतून

शेतात जाण्याचा मार्गच नसल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली होती. रस्त्यात आडव्या असलेल्या नाल्यावर पूल बांधून देण्याची मागणी करण्यात आली. कुणीच सहकार्य केले नाही. यामुळे आम्ही शेतकऱ्यांनीच हजार, दोनहजार रुपये वर्गणी गोळा करून पुलाचे बांधकाम केले.
नरेंद्र पोफळे, शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()