समुद्रपूर (जि. वर्धा) : लालनाला प्रकल्प व पोथरा धरणाचा कधी फेरफटका मारला तर विदेशी पक्ष्यांसह तेथील धरण काठावर हिरवागार शेतपरिसर सर्वांना खुणावतो. या धरण काठावर उमरीचे शेतकरी वारलुजी मिलमिले यांनी श्रमातून उभारलेला डांगराचा मळा येणाऱ्या-जाणाऱ्या पर्यटकांसह प्रवाशांनाही क्षणभर थांबून बघावासा वाटतो. तर वारलूजींच्या मळ्यातील डांगर खाल्ल्यानंतर डांगराची चव लय भारी असल्याचा अनुभव येतो. कोरोनाच्या संकटात सर्वच व्यवसाय डबघाईस आल्याचा प्रत्यय येत असला तरी वारलुजी मिलमिले यांची आर्थिक बाजू डांगरांच्या शेतीने सावरली आहे.
वारलूजी मिलमिले 75 वर्षांचे असून कधी काळी शेतकरी आंदोलनात सक्रिय असलेले कष्टाळू व्यक्तिमत्त्व आहे. किसान अधिकार अभियानचे प्रेरक अविनाश काकडे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. ही लढण्याची जिद्द त्यांची शेती कसण्याची कसब युवा शेतकऱ्यांना लाजवणारी आहे. दरवर्षी लाल नाला प्रकल्प व पोथरा धरणाचे पाणी कमी झाल्यावर धरण काठावर ते डांगराची शेती करतात. फेब्रुवारी महिन्यात लागवड केल्यानंतर एप्रिल महिन्यात उत्पादन निघायला सुरुवात होते. हिंगणघाट, वरोरा, भद्रावती ,चंद्रपूर येथील बाजारपेठेत ते विकायला नेतात.
एकदा वारलुजींच्या मळ्यातील डांगर खाल्ले की ग्राहक पुन्हा खाण्यासाठी आपोआपच ओढला जातो. डांगराला साखरेची चव असल्याचा गोडवा ग्राहक अनुभवतात. सर्वत्र लॉकडाउन असल्याने त्यांना बाजारपेठेत डांगर विकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागते आहे. मात्र, परिसरातील बाजारपेठ व गावोगावी डांगर विकली जात आहे. त्यामुळे इतर व्यवसायाला कोरोनामुळे फटका बसला असला तरी डांगर शेतीतून वारलूजी आर्थिक दृष्टीने सावरत आहे.
यावर्षी पोथरा धरणातील डांगर मळ्यावर पाण्याअभावी परिणाम झाला. अपुऱ्या पाण्याच्या भरवशावर पीक घेतले. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली. पण दुसरीकडे लालनाला प्रकल्पात डांगर मळा चांगला बहरला आहे. सध्या लॉकडाउनमध्ये ग्राहक डांगर मळ्यावर येऊन डांगराची खरेदी करीत असल्याने याचा फायदा शेतकरी मिलमिले यांना होत आहे. या कामात त्यांचे भालचंद्र आणि किशोर हे दोन्ही मुले मदत करतात. मात्र 75 वर्षीय या वृद्ध शेतकऱ्याचे परिश्रम इतरांना प्रेरणादायी ठरत आहे.
कोरोनाच्या भीतीने वारलूजींचा मुक्काम शेतात
शेतातील पिकांना फळे लागली की जंगली श्वापदांपासून धोका असतो. तीन महिने डांगरांची दिवस-रात्र राखण करावी लागते. वारलूजी तीन महिने शेताच्या राखणदारीसाठी मुक्कामी राहतात. तर घरची मंडळी दोन वेळचे भोजन पुरवतात. वयाच्या पंच्याहत्तरीतही वारलूजींची मेहनत तरुणांना लाजवणारी आहे.
शेतात मिळतो डांगरांचा पाहुणचार
धरणावर अनेक पर्यटक येत असतात. बहरलेली शेती पाहून अनेकांचे पाय तिकडे वळतात. शेतात गेल्यावर वारलूजी त्यांना आवर्जून अत्यंत आपुलकीने डांगर कापून खाऊ घालतात .पर्यटकांना भर रखरखत्या उन्हात मिळालेला पाहुणचार दिलासा देऊन जातो.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.