Gadchiroli : बाप तो बाप असतो! आजारी मुलीला कडेवर घेऊन पार केले पाण्याने ओसंडून वाहणारे २ नाले

देशाच्या आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सुविधांच्या आशा, आकांक्षा कधीच पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे अनेकदा नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे.
father carrying sick girl on his shoulders and crossed 2 streams overflowing water
father carrying sick girl on his shoulders and crossed 2 streams overflowing waterSakal
Updated on

गडचिरोली : देशाच्या आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सुविधांच्या आशा, आकांक्षा कधीच पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे अनेकदा नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे.

शनिवार (ता. १३)भामरागड तालुक्यातील बंगाडी गावात आपल्या तीन वर्षांच्या आजारी मुलीला वडिलांनी खांद्यावर घेत तिचा व स्वतःचा जीव धोक्यात टाकून पाण्याने तुडुंब भरलेले व खळाळून वाहणारे दोन नाले कसेबसे पार केले. तिला उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यामुळे तिचे प्राण वाचले. पण हे दोन नाले पार करताना या बाप-लेकीचा जीव कधीही जाऊ शकत होता.

छत्तीसगड सीमेवर वसलेला भामरागड तालुका जंगल, नदी- नाल्यांचा प्रदेश म्हणूनच ओळखला जातो. येथे अद्याप साध्या सुविधांचाही अभाव आहे. याच तालुक्यातील लाहेरी ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या बंगाडी गावातील रविना पांडू जेट्टी(वय ३) हिला ताप येत असल्याने शनिवारी सकाळच्या सुमारास तिच्या वडिलांनी तिला लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.

तिच्या रक्ताचे नमुने घेतल्यावर तिला मलेरिया असल्याचे कळले. त्यामुळे तिला दाखल करून तिच्यावर उपचार करणे गरजेचे होते. तसा सल्लादेखील येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र दाखल राहून उपचार घेण्यासाठी पांडू जेट्टी तयार नव्हता. अखेर त्याने दवाखान्यातून पळ काढला.

भामरागड तालुक्यात आजही अशीच परिस्थिती आहे. मात्र उपचाराअभावी रविना जेट्टी हिच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे येथील आरोग्य विभागातील अधिकारी आणि तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावातील प्रतिष्ठीत नागरिक लक्ष्मीकांत बोगामी आणि ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक ज्ञानेश्वर भांडेकर यांनी लाहेरीवरून ६ किलोमीटर अंतरावर असलेले बंगाडी गाव गाठून पांडू जेट्टीची समजूत घालून चिमुकलीला लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यासाठी विनवणी केली.

त्या मुलीच्या वडिलाने पांडू जेट्टीने होकार देताच बाप-लेकीला घेऊन तुडुंब भरलेले दोन नाले ओलांडत सायंकाळी ७.३० वाजता त्यांनी लाहेरी गाठले. अखेर रविना जेट्टी या चिमुकलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोकरे यांनी दिली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांनाही धोका

भामरागड तालुक्यातील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे राज्याच्या शेवटच्या टोकावर व छत्तीसगड सीमेवर असून या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ९ उप केंद्रातील जवळपास ४४ अतिदुर्गम गावांचा समावेश आहे. लाहेरीच्या पुढे वाहणाऱ्या गुंडेनूर नाल्या पलीकडील अनेक गावांचा पावसाळ्यात बाह्य जगाशी संपर्क तुटतो.

त्यामुळे या भागात रुग्णवाहिका देखील जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत केवळ रुग्णांनाच नाही तर आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील तुडुंब भरलेल्या नदी नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो.

येथेही घडू शकली असती अशी घटना

लोण्यावळ्यातील भुसी डॅम परिसरात नुकतीच एक मोठी दुर्घटना घडली होती. या परिसरात फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. या घटनेचा मन सुन्न करणारा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता.

रवीना, तिचे वडील पांडू व त्यांच्यासोबतचे आरोग्य कर्मचारी जंगलातील हे दोन भयंकर वाहणारे नाले पार करून बचावले. पण थोडीही गडबड झाली असती, तरी भुसी डॅमच्या घटनेची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागला नसता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.