वैयक्तिक आकसातून हलवले वीज मीटर, शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

Financial loss to the farmer as the electricity meter in the field is off
Financial loss to the farmer as the electricity meter in the field is off
Updated on

नागपूर  ः शेतीलगतच जांब नदी खळाळून वाहते. बारमाही पाण्याची सोय असल्याने पीकही जोमात यायचे. परंतु, चार वर्षांपूर्वी काहीतरी कारणावरून महावितरण अधिकाऱ्यासोबत झालेल्या वादामुळे सारेच बदलले. अधिकाऱ्याने वैयक्तिक आकसातून शेतातील विजेचे मीटर काढून लगतच्या शेतात लावले. पाच जुलै २०१७ रोजी घडलेल्या या प्रकारानंतर आजतागायत शेतीच्या सिंचनाची सोय नसल्याने वर्षातील केवळ पावसाळी पीक घ्यावे लागते. ज्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे, ही व्यथा आहे काटोल तालुक्यातील सिर्सावाडी येथील अल्पभूधारक शेतकरी युवराज पांडे यांची.

आजोबांच्या नावाने असलेले चाळीस वर्षांपूर्वीचे विजेचे मीटर ज्या ठिकाणी होते तेथे लावून द्यावे, या मागणीसाठी पांडे यांनी महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवले. परंतु काहीही फायदा न झाल्याने त्यांनी आपली कैफियत ‘सकाळ’कडे मांडली. ते म्हणाले, वर्षानुवर्षांपासून ज्या ठिकाणी असलेले वीज मीटर त्याच ठिकाणी लावून देण्याच्या हक्काच्या मागणीसाठी आपल्याला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आपली बाजू खरी असल्याने संबंधित अधिकाऱ्याची तक्रार वरिष्ठांकडे केली. ज्यामुळे त्यांची बदली करण्यात आली, याच कारणावरून जाता जाता त्या अधिकाऱ्याने वीज डीपीचे कारण सांगत वर्षानुवर्षांपासून असलेले मीटर काढून लगतच्या शेतात लावले. 

गेल्या चार वर्षांपासून मीटर बंद स्थितीत आहे. मीटरपेटी मूळस्थानी लावण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित साऱ्यांसोबत पत्रव्यवहार केला. शेतीसिंचनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार, शेतकरी समन्वय समिती तसेच मुख्यमंत्री सचिवालय नागपूर यांच्याकडे अर्ज करून त्यांना निर्देश देऊनही कार्यवाही होत नसल्याचे पांडे यांनी सांगितले. .

आत्मदहनाचा इशारा

शेतीचे सतत नुकसान होत असल्याने पांडे यांनी महावितरणच्या अधीक्षक, अभियंत्यांसह काटोलच्या दोन्ही अभियंत्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. वेळोवेळी अर्ज, विनवणी, कागदोपत्री व्यवहार केला. याशिवाय जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे कैफियत मांडली. परंतु काही फायदा झाला नाही. आगामी एक महिन्यात ही समस्या मार्गी न निघाल्यास शेतातच आत्मदहन करण्याचा इशारा युवराज पांडे यांनी दिला.

दिडशे झाडे वाळली

मीटर चाळीस वर्षांपासून ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी लावून द्या, अशी माझी रास्त मागणी आहे. परंतु निर्ढावलेले अधिकारी आणि सुस्त प्रशासन यामुळे गेल्या चार वर्षांपासून हा प्रश्न सुटलेला नाही. दरवर्षी होणाऱ्या नुकसानीसोबतच सिंचनाअभावी मोसंबीची दिडशे झाडे वाळली आहे.
-युवराज पांडे, अल्पभूधारक शेतकरी.

‘ना-हरकत प्रमाणपत्रच मिळालेले नाही’

महावितरणने ३१ मार्च १९९७ रोजी गणपतराव पांडे यांच्या नावे शेती पंपासाठी वीज जोडणी दिली होती. गणपतराव पांडे यांचा मुलगा युवराज पांडे यांनी महावितरणकडे २४ एप्रिल २०१७ रोजी तक्रार करून त्यांची मीटर पेटी छत्रपतीपांडे यांच्या शेतात स्थानांतरित केल्याचे कळवले. हे स्थानांतरण महावितरणने केलेले नाही. या घटनेची तक्रार महावितरणकडून २३ मे २०१७ रोजी स्थानिक पोलिसांत केली होती. गणपतराव पांडे यांच्या नावे शेती पंपासाठी वीज जोडणी दिल्यावर शेत जमिनीवर पोट हिस्से पडले असून, त्या ठिकाणी खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याची बाब निदर्शनास आली. यामुळे वारसा हक्कानुसार अन्य वारासदारांचे ना-हरकत प्रमाण पत्र महावितरणला मिळालेले नाही. या वारसदारांना भेटण्यासाठी महावितरणकडून ७ जुलै २०२० ही तारीख निर्धारित करण्यात आली असता कोणीही त्या ठिकाणी हजर झाले नाही. युवराज पांडे यांच्या अर्जानुसार कारवाई केल्यास वाद निर्माण होऊ शकतो याची माहिती लेखी स्वरूपात युवराज पांडे यांना देण्यात आली असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.