समुद्रपूर (जि.वर्धा) : कापूस खरेदीदरम्यान काट्यात घोळ करून शेतकऱ्यांची होत असलेली लूट करण्याचा प्रकार जाम येथील श्रीसुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज येथे सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. या तक्रारीची दखल घेत पोलिस आणि वजनमापे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या काट्याची शहानिशा केली असता घोळ असल्याचे उघड झाले. यावरून या जिनिंगमधील काट्याला सील ठोकत जिनिंग मालकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
रेणकापूर येथील शेतकरी सचिन हिरामण शेंडे यांना बुधवारी (ता. 16) सुदर्शन कॉटन जिनिंगमध्ये कापसाची गाडी आणली. गाडीचे कपाशीसह वजन केले असता 36 क्विंटल 25 किलो भरले. पण व्यापाऱ्याने दिलेला भाव न पटल्यामुळे त्यांनी कापूस गाडी थेट नजीकच्या श्रीवास कॉटन जिनिंगमध्ये नेली. येथे गाडीचे वजन केले असता 36 क्विंटल 85 किलो भरले. यात तब्बल 60 किलोचा घोळ असल्याचे पुढे आले.
वजनामध्ये घोळ असल्याचा त्यांना संशय आला. .आपल्यासारखी इतर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून त्याने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे, समुद्रपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्यासह वैधमापनशास्त्र विभागाचे वरिष्ठ निरीक्षक शनी मोरे, निरीक्षक प्रदीप झोडापे, वर्धा विभागाचे कय्यूम शेख, हिंगणघाट विभागाचे निरीक्षक प्रशांत मेश्राम, सहायक निरीक्षक प्रकाश चव्हाण यांनी वजनकाट्याची तपासणी केली. यात चार टन वजनानंतर मर्यादेपेक्षा जास्त फरक आढळला. वजनकाट्यात त्रुटी आढळल्यामुळे सदर वजनकाटयाला वैधमापनशास्त्र अधिनियमन 2009 अंतर्गत सील करण्यात आले. सुदर्शन कॉटन जिनिंगच्या मालकावर दंडात्मक किंवा न्यायालयीन कारवाई होण्याची शक्यता आहे.
शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक
गत एक वर्षापासून वजनकाट्यात तफावत असल्याची शेतकऱ्यांमध्ये कुजबूज होती. मात्र, कोणीही तक्रार केली नव्हती. आजच्या कारवाईनंतर शेतकऱ्यांचा अंदाज खरा निघाला. आतापर्यंत शेतकऱ्यांची लाखो रुपयाची लूट झाल्याची त्यांना खात्रीच पटली आहे.
वजनात गफलत भावात वाढ
सुदर्शन कॉटन इंड्रस्ट्रीजमध्ये कापसाला इतर जिनिंगपेक्षा चांगला भाव मिळायचा. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी गर्दी असायची. पण वजनात गफलत करून भाव जास्त दिला जात असल्याचे या कारवाईमुळे लक्षात आले.
संपादन - अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.