Gadchiroli Education : गडचिरोलीच्या शाळेची परसबाग राज्यातून प्रथम

Gadchiroli Education : गडचिरोली जिल्ह्यातील उदयनगर बांग्ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परसबागेला राज्यस्तरीय परसबाग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या सीईओ आयुषी सिंह यांनी या यशाबद्दल शाळा व्यवस्थापनाचे अभिनंदन केले आहे.
Gadchiroli Udyanagar Bangla Primary School Wins
Gadchiroli Education sakal
Updated on

गडचिरोली : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व शाळांमधून परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरिता घेण्यात आलेल्या परसबाग स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातील उदयनगर बांग्ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परसबागेला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे.

या पुरस्काराबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व सर्व संबंधितांचे अभिनंदन केले असून जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी इतर सर्वच शाळांनी आपल्या शाळांमध्ये परसबागा निर्माण करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे.

केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करून या परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश १५ ऑक्टोबर, २०१९ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिले आहेत.

परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे, ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत. शालेय परसबाग स्पर्धेकरिता तालुकास्तरावरील परसबागांचे मूल्यांकन करण्यात येऊन प्रत्येक जिल्ह्यातून एक परसबाग राज्यस्तरीय मूल्यांकनास पात्र ठरलेली होती.

अशा सर्व जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाच्या परसबागेचे परीक्षण पूर्ण करण्यात येऊन निर्धारित निकषांच्या आधारे राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय-दोन, तृतीय आणि प्रोत्साहनपर तीन अशा शाळांची निवड करण्यात आली. यात प्रथम क्रमांक गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्याच्या जिल्हा परिषद बांग्ला प्राथमिक शाळा उदयनगरला घोषित करण्यात आला आहे.

उत्कृष्ट परसबाग स्पर्धेकरिता निवड करण्यात आलेल्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचा विशेष सन्मान रविवार २९ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे होणार आहे.

धाराशिव व नाशिक द्वितीय

धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळी या दोन्ही शाळांना द्वितीय क्रमांक, सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबडपाल तृतीय क्रमांक तर प्रोत्साहनपर म्हणून वर्धेच्या आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंगापूर, यासह कोल्हापूर आणि बीडच्या शाळांना पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.