गडचिरोली : मुंबईत झालेल्या आमच्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून भाजपनेच मराठा आरक्षणाचे आंदोलन प्लॅन केले. पण सौम्य लाठीमाराऐवजी आंदोलकांना जबर मारहाण करण्यात आली. त्यामुळे हे प्रकरण आता सत्ताधारी भाजपवरच शेकले आहे.
राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला आरक्षणाचा प्रश्न सोडवताच येत नाही. ही समस्या सोडविण्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवणे आणि जातीनिहाय जनगणना हेच उपाय आहेत. हे जर सत्ताधारी भाजपला जमत नसेल तर आम्हाला सत्ता द्या आम्ही आरक्षणाचा प्रश्न चुटकीसरशी सोडवू, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
३ सप्टेंबरपासून काँग्रेसच्या वतीने जनसंवाद पदयात्रा काढण्यात येत असून मंगळवार (ता. ६) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गडचिरोली येथील या पदयात्रेत सहभागी झाले. त्यानंतर स्थानिक सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले की, सध्या देशात व राज्यात भयावह स्थिती आहे. तलाठी भरतीसारख्या परीक्षा खासगी कंपन्या ऑनलाइन पद्धतीने घेऊन भ्रष्टाचार करता आहेत, यात विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण होत आहे.
खत, बियाणे, कीटकनाशकांचे, डिझेलचे भाव बेसुमार वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकरी आत्महत्या चारपटीने वाढल्या आहेत. राज्यात आतापर्यंत ७५०० महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. पण राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले गृहमंत्री अवाक्षरही काढत नाहीत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी
भाजपचे किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमय्या यांचा तो व्हिडीओ खराच होता. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता.
मात्र, उलट सत्य बाहेर आणणाऱ्या पत्रकारावरच गुन्हा नोंदविण्यात आला. यावरून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची कशी मुस्कटदाबी सुरू असल्याचे दिसून येते, असा आरोप पटोले यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.