Gondia : सालेकसा येथे दीड कोटीचा धान घोटाळा

आठ हजार क्विंटल धान गायब; 'समृद्ध किसान'च्या अध्यक्षांसह १५ संचालकांवर गुन्हा
Gondia
Gondia sakal
Updated on

गोंदिया : सालेकसा येथील समृद्ध किसान शेती उद्योग साधनसामुग्री पुरवठा व खरेदी विक्री सेवा सहकारी संस्थेत एक कोटी ५५ लाख २० हजार रुपयांचा धान घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. जिल्हा पणन अधिकारी मनोज बाजपेयी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास संस्थेच्या गोदामांमध्ये केलेल्या चाैकशीत हा घोटाळा समोर आला असून, या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक व ग्रेडर अशा एकूण १५ जणांविरुद्ध सालेकसा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पणन महासंघाच्या जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयामार्फत सालेकसा येथील समृद्ध किसान शेती उद्योग साधनसामुग्री पुरवठा व खरेदी विक्री सेवा सहकारी संस्थेला सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान खरेदीकरिता करारनाम्याने नियुक्त करण्यात आले आहे. त्यानुसार, या संस्थेने पणन महासंघासोबत केलेल्या करारनाम्याप्रमाणे व शासनाच्या वेळोवेळी केलेल्या निर्गमित करण्यात येणाऱ्या नियम व अटींच्या अधीन राहून धान खरेदी करावयाचे आहे.

दरम्यान, पणन हंगाम २०२१-२२ मध्ये सदर संस्थेला शेतकऱ्यांचे धान खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक करण्याची पूर्ण जबाबदारी व खरेदी केलेले धान पणन महासंघाच्या देण्यात आलेल्या डिआेप्रमाणे भरडाई करण्याकरिता मिलधारकांना धानाची उचल देणे बंधनकारक आहे. असे असतानाही या संस्थेने दिलेल्या डिआेप्रमाणे मिलर्सना धान उचल दिलेला नाही. याबाबतच्या लेखी तक्रारी जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. या तक्रारींवरून जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी धान उचल देण्याकरिता नोटीस दिल्या.

मात्र, संस्थेकडून नोटीसाचे उत्तर देण्यात आले नाहीच, शिवाय धान उचलही देण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हा पणन अधिकारी बाजपेयी, सहायक निबंधक संजय गायधने, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी धनंजय देशमुख, कार्यालय सहायक ज्ञानदेव तनपुरे, हरीश चेटुले यांनी संस्थेने भाड्याने घेतलेल्या साखरीटोला येथील उर्मिला दोनोडे यांच्या मालकीचे गोदाम व रोंढा येथील अनिल अग्रवाल यांचे मालकीचे गोदाम येथे पंचासमक्ष पाहणी केली. या पाहणीत दोन्ही गोदामांमध्ये शासनाच्या आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेला ८ हजार क्विंटल धानसाठा गायब असल्याचे आढळले. या धानाची किंमत एक कोटी ५५ लाख २० हजार रुपये इतकी आहे. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष, संचालक व व्यवस्थापक अशा एकूण १५ जणांनी संगणमताने धान अपहार केल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी सालेकसा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे

अध्यक्ष वासुदेव महादेव चुटे (रा. आमगावखुर्द), संचालक भोजलाल अंतुलाल बघेले (रा. घोन्सी), घनश्याम नोणाजी बहेकार (रा. इसनाटोला), रोशनलाल वसंतराव राणे (रा. लोहारा), प्रेमलाल चैतराम तुरकर (रा. लोहारा), घनश्याम तानुजी नागपुरे (रा. मुंडीपार), राजेंद्र सुरजलाल बहेकार (रा. बोदलबोडी), खेमराज मोहनसिंह उपराडे (रा. मुंडीपार), दालचंद श्रीचंद मोहारे (रा. गोवारीटोला), ग्यानीराम आत्माराम नोणारे (रा. भजेपार), उमेश लहू वलथरे (रा. गिरोला), वंदना गुलाब अंबादे (रा. आमगावखुर्द), लिलाबाई रमेश धुर्वे (रा. जमाकुडो), व्यवस्थापक जगदीश रामप्रसाद खोब्रागडे (रा. सालेकसा), ग्रेडर अजय भरत फुंडे (रा. आमगावखुर्द) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

आठ जणांना अटक

सालेकसा ; या प्रकरणाचे गांभीर्य आेळखून सालेकसा पोलिसांनी शुक्रवारी (ता. १४) पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास आठ जणांना अटक केली आहे. राजेंद्र बहेकार, रोशनलाल राणे, प्रेमलाल तुरकर, घनश्याम नागपुरे, दालचंद मोहारे, उमेश वलथरे, जगदीश खोब्रागडे, अजय फुंडे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.