खडतर संसारातील आनंदी क्षण

shubhda tai
shubhda tai
Updated on

वर्धा येथील माहेर असलेल्या शुभदा देशमुख यांची डॉ. सतीष गोगुलवार यांच्याशी छात्र- युवा संघर्ष वाहिनी या जयप्रकाश नारायण यांच्या विचाराने प्रेरित संघटनेत ओळख झाली. वर्धा येथून बी. ए. चे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी समाजसेवेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पारंपरिक विचारसरणीच्या कुटुंबात वाढल्या असल्या तरी, शुभदाताईंचे विचार वेगळे होते.

घरात लग्नाचा विषय सुरू झाला तेव्हा आपल्याला नक्की काय करायचे आहे याची स्पष्टता नसली तरी सरधोपटपणे आयुष्य जगायंच नाहीय हा निश्‍चय शुभदाताईंनी मनोमन केला होता. संघर्षवाहिनीच्या माध्यमातून काही मित्रांनी मध्यस्थी करीत, डॉ. सतीश आणि शुभदाताईंच्या लग्नाचा प्रस्ताव कुटुंबासमोर मांडला. सुरूवातीला विरोध होत असला तरी, मुलगा डॉक्‍टर असल्याने विरोध बोथट होत गेला. त्यानंतर वर्षभरातच शुभदा देशमुख आणि डॉ. सतिश गोगुलवार यांचा विवाह पार पडला. सांसारिक आर्थिक अडचणीत मित्रपरिवार साथीला हजर झाला. काही महिने मित्रांची मदत घेतल्यावर त्यांनी स्वतःच उभे राहायचे ठरवले. तेथूनच खऱ्या संसाराला सुरूवात झाली. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे त्यांनी आपल्या संसाराला सुरूवात केली. आदिवासी परिसर आणि तेथील लोकांची वेगळी जीवनपद्धती याची सवय नसलेल्या शुभदाताईंना सुरूवातीला खुप अडचणी आल्यात. परंतु, येथील महिलांची जिद्द आणि खमकी वृत्ती पाहून त्यांनाही नव्याने उत्साह येत असे.

कुंकू, बांगड्‌या, मंगळसूत्र नाहीच...
लग्न झाल्यावर स्रियांनी सौभाग्यअलंकार म्हणून कुंकु लावावे, हातात बांगड्या घालाव्यात, गळ्यात मंगळसूत्र घालावे ही पारंपारिक विचारसरणी धुडाकावून लावीत, शुभदाताईंनी या सर्वांना फाटा दिला. लग्न रजिस्टर पद्धतीने झाले त्यामुळे मंगळसूत्र घालण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु, शुभदाताईंच्या आईने मंगळसूत्र घालण्याचा आग्रह केल्यावर डॉ. सतीश यांनी स्पष्ट शब्दात नाही सांगितले मी घालणार नाही, तिला हवे तर तिने स्वतः हून घालावे असा निग्रह त्यांनी त्यावेळी केला. त्यामुळे मंगळसूत्राचा प्रश्नी मिटला. परंतु, कुंकु लावणार नाही बांगड्याही घालणार नाही या निर्णयाला मात्र, कडाडून विरोध झाला. परंतु, या सर्व गोष्टी तुमची जात, धर्म दाखवून देतो. त्याच आम्हाला खोडून काढायच्या आहेत, त्यामुळे त्या आम्ही स्विकारणार नाहीत असे स्पष्ट सांगितल्यावर हळुहळु विरोध मावळला.
तरी, लग्नानंतरही मुलगी ख्रिश्‍चन असावी किंवा हिने धर्मबदल केला असावा अशी बोलणी रहात असलेल्या गावात शुभदाताईंना ऐकावी लागली. तरी, यासर्वांना दुर्लक्षीत करून त्यांनी कुंकु, बांगड्या आणि मंगळसूत्र या जात, धर्म दाखविणाऱ्या आभुषणांचा कधीही स्विकार केला नाही.

मजूर संघटनेसोबत कामाला सुरूवात
कुरखेडा येथे मोहन हिराबाई हिरालाल यांनी "बांधकाम व लाकुड कामगार संघटना या रोजगार हमी योजनेतील मजूरांची संघटना स्थापन केली होती. याच संघटने सोबत कार्य करण्याचे ठरवून, डॉ. सतीश आणि शुभदा यांनी कामाला सुरूवात केली. डॉ. सतीश यांना आरोग्याच्या प्रश्‍नावर काम करायचे होते तर, शुभदा यांना महिलांच्या समस्यांवर प्रकाश टाकायचा होता. आपण आपला मार्ग शोधूया... या विचारसरणीला धरून, दोघांनीही काम सुरू केले. कुरखेडा येथील लोकांच्या गरजेचा विचार करून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शुभदाताईंनी स्वतः ला कामात वाहून घेतले.

तीन महिन्याच्या बाळाला सांभाळतांना..
कुरखेडा येथे संसार थाटल्यावर वर्षभरातच डॉ. सतीश आणि शुभदा यांच्या जिवनात मुलगा सुशांतचे आगमन झाले. सुशांत जन्माला आला तेव्हाही कुरखेडा येथील स्थिती अतिशय बिकट होती. डॉ. सतीश यांचे चळवळीचे काम वाढले असतांनाच शुभदाताई बाळाच्या संगोपनात व्यस्त झाल्या होत्या. एकदा डॉ. सतीश कुरखेडा येथून आठ कि. मी. अंतरावर कार्यक्रमासाठी गेले असतांना, लहानग्या सुशांतला डायरीयाचा त्रास सुरू झाला. त्यावेळी कुरखेडा येथे डॉक्‍टर हजर नव्हते. केवळ एक स्थानिक मुलगा शुभदाताईंच्या सोबतीला होता. त्याला घेवून शेजारच्या सरकारी दवाखान्यात नेवून त्याचा जीव वाचवला. बाळाला डायरीयाचा त्रास सुरू होता तेव्हा त्याला स्वच्छ करायला पाणीही सहज उपलब्ध नसल्याचे शुभदाताई सांगतात. त्याक्षणी बाळासाठी मन हेलावले होते.
परंतु, आपण हा मार्ग का निवडला आणि इथं का आलो असा प्रश्न मनात कधीच आला नसल्याचे शुभदाताई प्रांजळपणे मान्य करतात.

बाईच्या जीवनातील थांबा "नदीचा घाट'
त्या काळात अनेक घरकामं स्वतः करत असल्याने, मला बायकांमध्ये सहज मिसळता आलं. विहीरीवर धुणे धुताना सुख दुखाबद्दल बोलायंच असलं की त्या जास्त धुणं आणतात, मनातलं खरं बोलतात हे कळलं. नदीचा घाट किंवा विहीरीचा काठ हे कामाचं ठिकाण नसतं. तर बाईच्या जीवनातला तो एक महत्वाचा थांबा आहे. हे तिथंच समजलं आणि त्याचा योग्य उपयोग शुभदाताईंनी आपल्या कामात करून घेतला. स्रियांच्या आरोग्याचीच नव्हे तर, कायद्याची माहीतीही खूपदा त्या नदीच्या काठावरच स्रियांना देत असतं. या नदीच्या काठावरच महिलांच्या संघटीत होण्याला पुढे "महीला मंडळ महासंघ' स्थापन होण्यास हातभार लागला.

स्वयंपाकात करते नवनवीन प्रयोग
सामाजिक कार्यकर्ता स्रियांचे घरकामात अथवा स्वयंपाकघरात लक्ष लागत नाही असे म्हटले जाते. परंतु, शुभदाताईंचे या उलट आहे. त्यांना स्वयंपाकघरात नवनवीन प्रयोग करायला आवडत. नेहमी काहीतरी नवीन पदार्थ तयार करून घरच्यांना खावु घालायची त्यांना आवड आहे. याशिवाय दत्तक घेतलेल्या दोन्ही मुलींच्या लहान मुलांसोबत खेळणं, घरासमोरची फुलबाग, फळबाग याची देखरेख करणे. घरीच सेंद्रीय पद्धतीने भाज्या पिकवणे असे अनेक छंद या फावल्या वेळात जोपासतात  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.