शेंबाळपिंपरी (जि. यवतमाळ) : लाकडाची मोळी आणली तरच आमदाराच्या घरची चूल पेटते. लॉकडाऊनमुळे रोजंदारी हिरावली. त्यामुळे मोळीचे ओझे डोक्यावर घ्यावे लागले.
आमदार' म्हणून हाक मारणाऱ्या नागरिकांना ते तितक्याच आदराने प्रतिसाद देतात. आश्चर्य वाटत असले तरी हे सत्य आहे.
ग्रामपंचायत ते लोकसभा अशा निवडणूक लढता लढता त्यांचे अख्खे आयुष्य गेले. विजय पदरात पडला नाही. मात्र, गावगाड्यात "आमदार' ही ओळख मात्र मिळाली. गावातच नाही तर जिल्ह्यात असा नागरिक नसेल त्याला उत्तम भगाजी कांबळे हे नाव माहीत नसेल. या "आमदारा'चा संघर्ष सुरूच आहे. उत्तम कांबळे यांचे निवडणुका लढवता लढवता अख्खे आयुष्य गेले. घराची वाताहत झाली. शेळ्या, कोंबड्या विकाव्या लागल्या. निवडणुकीत अनामत रक्कम भरण्यासाठी तीन-चार महिने मुंबईत बांधकामावर वेठबिगारी करावी लागली. पतीच्या निवडणुका लढविण्याच्या छंदामुळे अर्धांगिनीने केव्हाच माहेरची वाट धरली. पण एक फलित झाले, गाव त्याला "आमदार' म्हणू लागले.
लोकं आपुलकीने म्हणतात आमदार
आजही गावात आमदार शब्द उच्चारला तर नागरिक आपुलकीने उत्तम कांबळे यांचेच नाव आवर्जून घेतात. पण आता लॉकडाउनमध्ये हे स्वयंघोषित आमदार करतात तरी काय... तर चक्क मोळी आणून आपल्या वार्धक्याकडे झुकलेल्या आईला मदत करतात. ग्रामपंचायत ते लोकसभा अशा एकूण 35 निवडणुका त्यांनी लढविल्या. मताच्या जोगव्यासाठी सर्वच उमेदवार मतदारांच्या चुलीपर्यंतही जातात. परंतु सद्य:स्थितीत अनेकांच्या चुलीतून निघत नसलेला धूर कोणाच्याही दृष्टिपथात येत नाही. लॉकडाऊनच्या प्रारंभी मदतीचे गाठोडे देताना फोटोसेशन करणारे आता गायब झाले आहेत. शेवटी शासनाच्या स्वस्त धान्य वितरण व मोफत तांदूळ वाटपाचा ग्रामीण नागरिकांना मोठा आधार झाला आहे. अधिकृत आमदार नसले तरी गावात उत्तम कांबळे यांच्याच नावाला "आमदार'कीचे लागलेले बिरुद लागले आहे.
चटणी-भाकर खाऊन जनजागृती
उत्तम कांबळे कोरोनाच्या संकटात जनजागृती करण्यात मागे नाहीत. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व ते नागरिकांना सांगत आहेत. सकाळी गावालगतच्या जंगलातून सुकलेल्या लाकडांची मोळी आणल्यावर घरची चटणी-भाकर खाऊन बाहेर निघतात. जवळच्या खेड्यात जाऊन कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना ते आपल्या खास शैलीत सांगत असतात. हेही दिवस निघून जातील, काळजी करू नका म्हणून नैराश्यात असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या चेहऱ्यांवर हास्य आणण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.