Latest Manapa News: मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याने सर्वत्र तीव्र निषेध करण्यात आला. त्यामुळे महापुरुषांचे पुतळे उभारल्यानंतर त्यांची देखभाल दुरुस्तीकडे प्रशासन पातळीवर लक्ष देणे अपेक्षित आहे.
मात्र, प्रशासन महापुरुषांच्या पुतळ्यांच्या सुरक्षेसंदर्भात उदासीन आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जालना शहरात महापालिका हद्दीत महापुरुषांची किती पुतळे आहे, याचा लेखा जोखाच नाही. त्यामुळे महापुरुषांच्या पुतळे आणि स्मारकाचे स्ट्रक्चरल ऑडिट अद्यापि झालेले नाही. मालवणप्रमाणे पुन्हा एखादी दुर्घटना झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी अनेकजण पुढाकार घेतात. तशी मागणी प्रशासन आणि शासनाकडे केली जाते. मात्र, महापुरुषांचे पुतळे उभारल्यानंतर त्यांचे पावित्र्य जपणेही अत्यावश्यक आहे. मात्र, तसे होताना दिसून येत नाही.