`हमरी उमर ढल गई, लेकीन कोच्छी प्रकल्प नही हुआ`

Kochi water project has been Stuck for 26 years
Kochi water project has been Stuck for 26 years
Updated on

कोच्छी (ता. सावनेर, जि नागपूर) ः कोरड्या ठण्ण विहिरी. पाण्याविना झुरणारे तलाव. तहानेने व्याकूळ झालेले जितराब. असे दृश्य आज सगळीकडे दिसते. भविष्यातील हे भयंकर वास्तव सुनील केदार यांच्या द्रष्ट्या नजरेने हेरले होते. ते सावनेर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी त्यांनी कन्हान नदीवर जलप्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला. कोच्छी येथे कामही सुरू झाले. प्रकल्प पूर्ण झाला असता तर भूजल पातळी वाढली असती. शेतीचे सिंचन झाले असते. नागपूर शहरालाही पाणी मिळाले असते. एवढेच नव्हे तर नजीकच्या मध्यप्रदेशातील छिंदवाडा भागालाही जल-लाभ झाला असता. या प्रकल्पासाठी हजारो नागरिक आस लावून बसले आहेत. `छब्बीस साल गुजर गये बाबू अच्छेलालजी. हमरी उमर ढल गई. हमरी जनरेशन बरबाद हो गई जी.` टेंभुरडोह येथील एका सत्तर वर्षीय नागरिकाच्या या प्रतिक्रियेने माझे मन हेलावून निघाले. कोच्छी, बडेगाव, खर्डुका चोरखैरी, रायवाडी आणि ढालगाव (खैरी) या गावातील लोकांनीही अशीच भावना व्यक्त केली.
 

२६ वर्षांचा पट डोळ्यांपुढे

नागपूर येथे `सकाळ`चे कार्यकारी संपादक संदीप भारंबे आणि त्यांच्या टीमसोबत सविस्तर चर्चा करून नागपूर जिल्ह्यातील टूरचे नियोजन केले. रात्रीच सावनेरात पोहोचलो. नागपूर-सावनेर काय झकास रोड झाला आहे यार! रोडला चिपकून गाडी धावते. पोटातले पाणीही हलत नाही. रविवारी सकाळी सहा वाजता सकाळचे तालुका बातमीदार मनोहर घोळसे पोहोचले. त्यांच्या गाडीत निघालो थेट कोच्छीकडे. प्रवासात त्यांनी कन्हान नदीवरील रखडलेल्या या कोच्छी जलप्रकल्पाच्या सव्वीस वर्षांच्या इतिहासाचा पटच डोळ्यांपुढे उभा केला. पहिल्याच दिवशी `व्हायब्रंट विदर्भ`चे खऱ्या अर्थाने दर्शन घडले.

‘गाव बसा नही की लुटेरे आ गये’; जिल्हा परिषदेचे राजकारण सुरू; इच्छुकांकडून मोर्चे...

व्यवस्थित हाताळला नाही पुनर्वसनाचा प्रश्न

या परिसरातील नागरिकांसाठी हरितक्रांतीची पर्वणी ठरेल असा हा प्रकल्प आहे. नागपूरकरांनाही पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरू शकतो. प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येणाऱ्या कोच्छी, ढालगाव खैरी व रायवाडी या तीन गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रशासनाला व्यवस्थित हाताळता आला नाही. जेव्हा प्रकल्प उभारण्याचे ठरले तेव्हा महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावाद उफाळला. प्रशासकीय सर्व्हेमुळे खासगी गावठाण व झुडपी जंगल असा घरांचा वाद झाला. तोही निस्तारावा लागला. प्रकल्पग्रस्तांचा मोबदला, पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात मोठा काळ गेला. मंत्री होताच सुनीलभाऊ केदार यांनी मंत्रालयाकडे हा प्रश्न रेटून धरला आहे. आता तरी कोच्छी प्रकल्प पूर्ण होईल आणि शेवटच्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन मार्गी लागेल, अशी भाबडी आशा येथील लोकांमध्ये निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद सदस्य छाया बनसिंगे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर बनसिंगे, सुरेश बनसिंगे, प्रफुल्ल देहारे, उकंडराव सोनवणे, राजेश कुडे, संजय नागपूरकर, शेषराव कुडे, महेश चरडे हे या प्रकल्पाबाबत भरभरून बोलले.

वादग्रस्त पोलिस निरीक्षक अरविंद भोळे ‘लुटेरी दुल्हन’...

एकही प्रकल्प नाही

गोदावरी खोऱ्याच्या प्राणहिता उपखोऱ्यातील नागपूर शहराच्या परिघात वाहणारी कन्हान ही महत्त्वाची नदी आहे. तिच्या उगमापासून वैनगंगा नदीतील संगमापर्यंत अद्याप एकही प्रकल्प बांधला गेला नाही. मात्र कोच्छी प्रकल्प झाला तर हा भाग सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. उन्हाळ्यात जलस्त्रोत आटले तरी शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी कुठेही भटकावे लागणार नाही. एवढी क्षमता त्यात आहे.
 

जिल्ह्यासाठी महत्त्वाचा
पाण्याचा फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी व गावांना पिण्यासाठी होणार आहे. नियोजनानुसार येथील पाण्याचा पुरवठा पेंच प्रकल्पाला होईल. सिंचनापासून वंचित ४४३१ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. नागपूरकरांची तहान भागविण्यासाठी हा प्रकल्प लाभदायी ठरेल. एकंदरीत जिल्ह्यासाठीच हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
प्रकाश पराते, उपसभापती, पंचायत समिती, सावनेर
 
सर्वांनाच लाभदायक
धरणातील जलसाठ्याचा उपयोग कालव्यांद्वारे शेतकरी बांधवांना सिंचनासाठी होईल. त्यामुळे ओलित क्षेत्रात वाढ होईल. वेगवेगळ्या पीक उत्पादनास मदत होईल. तालुक्यातील शेतकरी सक्षम झाल्यास बाजारपेठेलाही संजीवनी मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प सर्वांसाठी लाभदायक ठरणार आहे.
विनोदकुमार जैन, अध्यक्ष, व्यापारी संघ , सावनेर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.