मुंडीकोटा (जि. गोंदिया) : सालेकसा तालुक्यातील आमगावखुर्द येथील निवासी वसतिगृहातून परतताना ठाणा येथे पाच कुटुंबीय तंबू लावून दिसले. येथील शाळाबाह्य मुलांच्या मदतीला गोंदिया जिल्ह्याच्या समन्वयक बालरक्षक कुलदीपिका बोरकर धावून आल्या. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शाळाबाह्य विद्यार्थी म्हणून शाळेत दाखल करण्याचे आदेश दिले. बुधवारी (ता. २५) देवास मध्य प्रदेशातील प्लास्टिक ड्रम विकणाऱ्या कुटुंबाला भेट देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची समज दिली.
निवासी वसतिगृह आमगाव खुर्द, ता. सालेकसाहून गोंदियाला सायंकाळी पाचच्या दरम्यान परत येत असताना ठाणा, ता. आमगाव येथे अस्थायी कुटुंबाचे पाच तंबू बालरक्षक जिल्हा समनव्यक कुलदीपिका बोरकर यांना दिसले. त्यांनी या कुटुंबीयांची भेट घेतली. तंबूच्या जवळ जाऊन पालक व मुलांची आस्थेने विचारपूस केली. पाचही कुटुंब देवास, मध्यप्रदेशमधून आमगावात आल्याचे त्यांना कळले.
कुणीतरी अधिकारी आपल्याला काय विचारायला येत आहे, असा प्रश्न तेथील पुरुष व स्त्रियांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यानंतर पालकांना ६ ते १४ वयोगटातील किती बालके आहेत, याची माहिती कुलदीपिकाने विचारली. यात कंचन तुफान बटोला (वय ६), ऋतिक तुफान बटोला (वय ८), रोहित तुफान बटोला (वय १०), रोहित जगदीश टाकिया (वय ८), रोहित राजू टाकिया (वय ६), अशी मुले आढळून आली.
धक्कादायक बाब अशी की, रोहित टाकिया हाच मुलगा अंगणवाडीत शिकला होता; तर उर्वरित सर्व कधीच शाळेत गेले नसल्याची माहिती पालकांनी दिली. ही कुटुंब सतत स्थानांतर करून उपजीविका करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यांचा पुढला मुक्काम मोहाडी येथे असल्याचे पालकांनी सांगितले. त्यामुळे उपस्थितांना शिक्षणाचे महत्त्व तसेच शिक्षण हमी पत्रक याची माहिती देण्यात आली. जवळच्याच ठाणा शाळेत मुलांना २४ नोव्हेंबर रोजी दाखल करण्याबाबत समज दिल्यावरून पालकांनीसुद्धा तयारी दर्शविली आहे.
कुमुदिनी घोडेस्वार समन्वयक बालरक्षक आमगाव यांना मुले दाखल होतील. याची खात्री करून शिक्षण हमी पत्रक व पाठपुरावा करण्याबाबत सांगण्यात आले. पालकांशी संवाद साधताना ते प्लास्टिकचे ड्रम विकण्याचे व्यवसाय करून उपजीविका करीत असल्याचे समजले. पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. जेथेही जाऊ, तेथे मुलांना शाळेत दाखल करू, अशी सकारात्मकता पालकांनी दाखविली. यावेळी अश्वीन वाहणे, लेखाधिकारी महावीर अमानावार, सहायक लेखाधिकारी संतोष खेरडे बालरक्षक आणि संजय गालपल्लीवार, वाहनचालक हजर होते. शिक्षण घेण्यासाठी चांगले वातावरण व मार्गदर्शन सगळ्यांनाच मिळते, असे नाही. तेव्हा आपण अशा वेळी शिक्षणाची दिशा दाखविली तर निश्चीतच शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश मिळेल. इतर बालरक्षकांना हे उदाहरण हे प्रेरणादायी ठरणारे आहे.
जबाबदारी पार पाडली
आपल्यावर असलेली जबाबदारी आपण किती प्रामाणिकपणे पार पाडून त्या यशस्वी करण्यासाठी आपण किती योगदान दिले, याचे समाधान झाले पाहिजे. यातच योजना, प्रकल्पासह राष्ट्र-राज्याचे सौख्य सामावले आहे.
- कुलदीपिका प्र. बोरकर
जिल्हा समन्वयक बालरक्षक, गोंदिया.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.